वकिलाने न्यायाधीशाच्या कानपटात शेकली

नागपूर/ प्रतिनिधी
न्याय मंदिरात कानशिलात लगावल्याने खळबळही माजली. न्यायाधीशाने मालमत्तेसंदर्भातील दावा खारीज केल्याचा राग मनात ठेवून बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकिलाने दिवाणी न्यायाधीशांवर हल्ला केला.पोलिसांनी सहायक सरकारी वकील गिरीपेठ निवासी दिपेश मदनलाल पराते यांना अटक केली़ सदर पोलिसांनी पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण रंगराव देशपांडे यांच्या तक्रारीवर गुन्हा नोंदविला आहे.
दिपेशचे वडील अ‍ॅड. मदनलाल यांचे त्यांच्याच भावांशी मालमत्तेवरून वाद सुरू होता. २८ नोव्हेंबरला न्यायमूर्ती देशपांडे यांच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली आणि निर्णय मदनलाल यांच्या विरुद्ध गेला होता. यामुळे दिपेश संतापलेले होते. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास न्या. देशपांडे आठव्या माळ्यावर प्रभारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. इंगळे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. काम आटोपल्यानंतर न्या. एस. व्ही. देशमुख यांच्यासह लिफ्टची प्रतीक्षा करीत उभे होते. दरम्यान आठव्या माळ्यावर असलेल्या पराते यांनी देशपांडे यांच्याकडे रागाने पाहिले. ते पायºया उतरून देशपांडे यांच्याजवळ आले आणि देशपांडे यांच्या डाव्या गालावर जोरदार थापड मारली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे यांना भोवळ आल्यासारखे झाले. त्यांचा चष्माही खाली पडला. पराते यांनी त्यांना जीवे मारण्याची व पाहून घेण्याची धमकी दिली व तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशपांडे यांनी आरडाओरड केली असता जवळच तैनात कॉन्स्टेबल संतोष पांडे यांनी पराते यांना पकडले. न्या. कुळकर्णी यांच्या स्टेनोच्या कक्षात दोघांनाही नेण्यात आले. यानंतर पराते यांना न्याय मंदिर परिसरातील पोलिस चौकीत आणण्यात आले. माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. न्या. देशपांडे यांच्या तक्रारीवरून पराते यांच्याविरुद्ध कर्तव्यावरील सरकारी अधिकाºयावर हल्ला करण्याचा व धमकी देण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. सायंकाळी पोलिसांनी पराते यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली. अ‍ॅड. मंगेश मूनसह जवळपास २०-२५ वकील बचावपक्षाची बाजू मांडण्यासाठी पोहोचले आणि पोलिस कोठडीला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर पराते यांची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. यासोबतच बचावपक्षाने जामीन अर्जही दाखल केला आहे. या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.