नऊ जण जागीच ठार


 यवतमाळ-कळंब मार्गावरील चापर्डानजीक ट्रकने क्रुझरला दिलेल्या धडकेत नऊ जण जागीच ठार झाले. तर आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.


कळंब तालुक्यातील पार्डी(सुकळी) येथील कांबळे व थूल परिवारातील सदस्य साक्षगंधासाठी यवतमाळ येथे गेले होते. साक्षगंध आटोपून क्रुझरने (एम.एच.२९/आर-७१५९) रात्री सर्व सदस्य कळंब मार्गे पार्डीला जात होते. याचवेळी चापर्डानजीक समोरून सिलिंडर भरून येणा-या ट्रकने (एम.एच.४०/३२८८) क्रुझरला जोरदार धडक दिली.
या अपघातात कांबळे व थूल परिवारातील सात सदस्य जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की क्रुझरचा पार चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच गावक-यांसह कळंब पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतांना रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमी आठ जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मृतांमध्ये नियोजित वर नितीन रमेश थूल याची आई सुशीला रमेश थूल (५०) व वडील रमेश पुंडलिक थूल (५५) यांचा समावेश आहे. या दोघांशिवाय तानबा पुंडलिक थूल (६५), क्रुझर चालक सचिन बाबाराव पिसे (२२), सोनाली शैलेश बोदडे, सक्षम प्रशांत थूल (८ वर्षे) व अन्य तीन जण ठार झाल्याचे कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर यांनी सांगितले. उर्वरित तिघांची नावे कळू शकली नाही. जखमींमध्ये वर नितीन रमेश थूल, अमोल नवघरे (२५) रा.नागझरी (ता.देवळी) आणि शैलेश शालिक बोंद्रे (४५) रा.पार्डी, शरद बाबाराव कांबळे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.