विम्याविषयी आजही अनेक चुकीचे समज

अनुप सेठ 
आयुर्विमा ही एक अत्यावश्यक बाब असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आयुर्विम्याच्या एकूण हप्त्यांचे प्रमाण हे जीडीपीच्या केवळ पावणेतीन टक्के असल्याचे चालू वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. याशिवाय, ज्या व्यक्तींनी विमा घेतलेला असतो त्यातील बहुतांश व्यक्ती या अंडरइन्श्युअर्ड म्हणजे सोप्या भाषेत, अपुऱ्या रकमेचा आयुर्विमा घेतलेल्या असतात. काही वर्षांपूर्वी आयुर्विमा घेण्याची प्रक्रिया ही काहीशी प्रदीर्घ व वेळखाऊ होती. मात्र आता अनेक कंपन्यांचे पर्याय असल्याने तसेच, ऑनलाइन विम्याची सुविधा असल्याने आयुर्विमा खरेदी करणे सोपे झाले आहे. तरीही संपूर्ण कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणाऱ्या आयुर्विम्याला आजही प्राधान्य दिले जात नाही. एवढेच नव्हे तर आयुर्विम्याविषयी बहुतांश मंडळी गैरसमजूती बाळगतात. मी अतिशय निरोगी आहे, माझ्याकडे बरीच संपत्ती आहे, मला बिलकूल वेळ नाही आदी असंख्य कारणे आयुर्विमा टाळण्यासाठी पुढे केली जातात. ही मानसिकता अतिशय घातक असून त्यात बदल होणे गरजेचे आहे. आयुर्विम्याविषयी असणाऱ्या चुकीच्या समजुतींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. 

Image result for विमा
केवळ करबचतीचे साधन 

आयुर्विमा हे केवळ करबचतीचे साधन आहे ही फार चुकीची समजूत सर्वत्र दिसून येते. आयुर्विमा खरेदी केल्याने तुम्हाला करबचतीचे लाभ मिळतात यात काही शंका नाही. परंतु हे काही विमा खरेदीचे एकमेव कारण असू शकत नाही. योग्य सल्ल्यानुसार आयुर्विमा घेतल्यास ते केवळ तुमच्या कुटुंबाचे सुरक्षाकवच ठरत नाही, तर अर्थसंकलनाचे साधनही होऊ शकते. गंभीर आजार, अपघात आदी अप्रिय प्रसंगी तुमच्या बचतीला धक्का लागणार नाही याची काळजी आयुर्विमा पॉलिसी घेते. त्यामुळे याकडे केवळ करबचतीच्या दृष्टीने पाहू नये. 

गरज केवळ कर्त्या व्यक्तीला 

आयुर्विम्याची गरज ही केवळ घरातील कर्त्या व्यक्तीला असते हा समजही चुकीचा आहे. घरातील प्रमुख कमावत्या व्यक्तीवर पूर्ण घर अवलंबून असते व त्यामुळे त्या व्यक्तीचा आयुर्विमा असणे हे गरजेचेच असते. मात्र गृहिणीदेखील तितकीच महत्त्वाची असते. गृहिणी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असते. या जबाबदाऱ्यांचे मूल्य किती याचा विचार आता सरकारी स्तरावरही होऊ लागला आहे. त्यामुळे गृहिणीला आयुर्विम्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढणे साफ चुकीचे ठरते. उलटपक्षी, घरातील कर्त्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराचा विमा उतरवून त्याच्या सुरक्षाकवचाची खातरजमा करून घेतली पाहिजे. तुमच्या गैरहजेरीत जोडीदारावर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. अशा स्थितीत त्यांच्याकरिता एखादा टर्म प्लॅन घेणे हा योग्य निर्णय ठरू शकतो. 

आयुर्विमा महाग आहे 

आयुर्विम्यावर फार मोठी रक्कम खर्च करावी लागते, असे काहींना वाटते. मात्र त्यात तथ्य नाही. योग्य संशोधन आणि योग्य सल्ल्यानुसार, तुम्ही वर्षाला पाच हजार रुपयांच्या बदल्यात ५० लाख रुपयांचे विमाकवच मिळवू शकता. आयुर्विमा कमी वयात खरेदी केल्यास टर्म इन्शुरन्सचा खर्च आणखी कमी होईल. तरुण ग्राहक हा अधिक सुदृढ असतो. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय व जुजबी तपासण्यांच्या आधारे या व्यक्तीला कमी शुल्कात मोठे विमाकवच मिळू शकते. 

प्रकृतीविषयक समस्यांमुळे अपात्रता 

प्रकृतीच्या समस्या असल्यास आयुर्विमा घेता येत नाही असे नाही. परंतु, त्यामुळे तुम्ही भरत असलेल्या पॉलिसी प्रीमियमवर परिणाम होतो. तरीही विमाकवच हे मिळतेच. प्लानमध्ये आधीच नमूद असलेल्या काही गंभीर आजाराचे निदान झाल्यास विमाधारकाला ठरावीक रक्कम मिळते हे नक्की. आपण सर्वजण ज्या धकाधकीचे जीवन जगत आहोत ते पाहता अतिरिक्त खर्च करून आयुर्विमा खरेदी केल्यास ते स्वत:सह कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी चांगलेच ठरते. 

कर्ज नसल्याने विम्याची गरज नाही 

पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीच्या नावे गृहकर्ज असल्यास त्याने आयुर्विमा घेणे अत्यावश्यकच आहे. परंतु एखाद्या कर्त्या व्यक्तीच्या नावे गृहकर्ज वा अन्य कोणतेही कर्ज नसले तरी त्यानेही आयुर्विमा घेणे अत्यावश्यक ठरते. जीवनातील अनिश्चिततेचा विचार करता आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी आयुर्विम्याला पर्याय नाही. विमाधारकाच्या बाबतीत दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्यास विम्याच्या आधारे त्या कुटुंबाचे राहणीमान पूर्वीप्रमाणेच चांगले राहू शकते.
(सदर माहिती महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातून 
घेण्यात आली आहे)