मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जुगार अड्ड्यावर छापा

अनिकेत मेश्राम
कोराडी /प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील महादुला येथील जुगार अड्ड्यावर राज्याचे पालकमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी छापा मारला व अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश दिले. यामुळे कोराडी व महादुल परिसरात जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. महादुला येथेच बावनकुळे यांचे घर आहे.

त्यांच्या मतदारसंघात असलेल्या जुगार अड्ड्याच्या विरोधात गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. परंतु हा जुगार अड्डा बंद करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. बावनकुळे आज सकाळी साडेसात वाजता लवाजमा घेऊन या जुगार अड्डयावर गेले. बावनकुळे आल्याबरोबर सर्वांचे धाबे दणाणले. यावेळी त्यांनी तात्काळ विजेचे कनेक्‍शन तोडण्याचे निर्देश दिले.

विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांपासून महादुला गावातील लोक या संदर्भात तक्रार करीत होते. यावर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती परंतु अनधिकृत बांधकाम मात्र तोडले नव्हते. आज अचानकपणे बावनकुळे यांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

छाप्याच्या ठिकाणी पोलिसांना फारसे काही हाती लागले नसल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी बिअरची एकच रिकामी बाटली आढळून आली. पालकमंत्र्यांनी स्वतः हजर झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संतोष शाहू याला ताब्यात घेतले आहे.