सुपर स्पेशालिटीत लवकरच रोबोटिक्स सर्जरीची सुविधा


नागपूर, दि. 31 : नागपूर हे शहर आंतरराष्ट्रीय शहर होत आहे. साधारणत: 70 हजार कोटीचे विकासकामे सुरू आहेत. सर्व सोयीयुक्त आतंरराष्ट्रीय शहर होत असतांना या शहरातील आरोग्य सुविधा देखील गुणात्मक असाव्यात यासाठी सुपरस्पेशालिटी रूग्णालयात देशातील पहिली रोबोटिक्स सर्जरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल,असे आश्वस्त उद् गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले.

सुपरस्पेशालिटी रूग्णालयातील न्युरोसर्जरी शल्यक्रिया गृहाचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ.अभिमन्यू निसवाडे,सभागृह महानगरपालिका सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मेंदुरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रमोद गिरी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, मेंदुची शल्यक्रिया अत्यंत क्लिष्ट शल्यक्रिया आहे. डॉ. प्रमोद गिरी हे अनेक वर्षापासून या मॉड्युलर ओटीच्या निर्मीतीसाठी प्रयत्नरत होते.या ओटीच्या निर्मीतीसाठी शासनाने दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला.

यावेळी बोलतांना डॉ. प्रमोद गिरी म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 13 मॉड्युलर ओटी तयार केल्या आहेत. लवकरच न्युरोलॉजीतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल असे प्रयत्त्न सुरू आहेत.

सुपरस्पेशालिटीत चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.50 नि:शुल्क कीडनी प्रत्यारोपण केले असल्याचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यूनिसवाडे यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या मदतीतूनच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

रूग्णासाठी डॉकटर हे देवदूतच असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की डॉ. प्रमोद गिरी हे निष्णात मेंदुरोग तज्ज्ञ आहेत .मॉड्युलर ओटीच्या निर्मीतीसाठी त्यांनी सातत्याने आग्रह केला. मॉड्युलर ओटीच्या माध्यमातून अस्वस्थ मेंदुरोग रुग्णांना चांगल्या आरोग्यसुविधा मिळतील. खनिज विकास प्रतिष्ठानमधून व्हेंटीलेटरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या लोकार्पण कार्यक्रमाला सुपरस्पेशालिटीतील विविध विभागप्रमूख व पारीचारिका उपस्थित होते. संचलन व आभार डॉ. सागर शहाणे यांनी केले.