हिरकणी महाराष्ट्रमुळे मिळणार महिला उद्योजिकांना हक्काचे व्यासपीठ


- संभाजी पाटील - निलंगेकर

मुंबई, दि. 9 : जागतिक पातळीवर महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील महिला उदयोजिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हिरकणी महाराष्ट्राची हा उपक्रम नक्कीच प्रभावशाली ठरेल असा विश्वास कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीची तिसरी सर्वसाधारण सभा आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. तसेच सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य ‍विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेंद्र सिंह,ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू विलास भाले, दिनेश सूर्यवंशी,पायोनी भट, राहुल कंकरिया, डॉ. अविनाश पात्रुरकर, राज नायर, ए. वि. सप्रे यावेळी उपस्थित होते. यावेळी सोसायटीमार्फत वर्षभरात राबविले जाणारे विविध उपक्रम तसेच 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह याविषयीची चर्चा करण्यात आली.

महिलांमध्ये असलेल्या कल्पनाशक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न हिरकणी महाराष्ट्राची मधून करण्यात येणार असून याची सुरुवात लातूर येथून होणार आहे. आरोग्य सुविधा, शेती, तंत्रज्ञान, सामाजिक प्रभाव, संतुलित विकास आणि पर्यावरण अशी पाच क्षेत्रे यासाठी निवडण्यात आली असल्याचे कौशल्य विकास मंत्री यांनी यावेळी सांगितले.

इच्छुकांना मिळणार अभिनव संकल्पना सादर करण्याची संधी

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या (महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारष्ट्र स्टार्ट अप सप्ताहामुळे इच्छुकांना आपल्या अभिनव संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार असल्याचे कौशल्य विकास व उदयोजकता मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले.

श्री. पाटील-निलंगेकर यावेळी म्हणाले, स्टार्ट अप सप्ताहामुळे इच्छुक स्टार्टअपना त्यांच्या अभिनव संकल्पनांच्या सादरीकरणासाठी नामी संधी उपलब्ध होणार असून यामुळे थेट शासनासोबत काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण, कौशल्य, आरोग्यसेवा, शेती, स्वच्छ ऊर्जा, पाणी आणि कचरा व्यवस्थापन ,जल व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये अभिनव संकल्पना सादर करण्याची संधी या सप्ताहामुळे मिळणार आहे. जल व्यवस्थापन, उत्तम पायाभूत सुविधा,गतिशील प्रशासन आणि सायबर सुरक्षा याविषयाबाबतही काही वेगळे विचार असतील तर ते पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज केलेल्यांपैकी उत्कृष्ट ठरलेल्या १०० स्टार्टअप्सना त्यांच्या अभिनव संकल्पना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्या समोर मांडण्याची संधी मिळणार आहे. स्टार्टअपनी सादर केलेल्या सादरीकरणाच्या आधारे समितीमार्फत चर्चा होवून त्यातील निवडल्या गेलेल्या २४ विजेत्या स्टार्ट-अप्सना प्रत्येकी रु. १५ लाख रुपयांपर्यंतची शासकीय कामे देण्यात येणार आहेत.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2019 असून इच्छुक स्टार्टअप www.mahastartupweek.msins.in याठिकाणी अर्ज करू शकतात. तसेचwww.twitter.com/MSInSociety, www.facebook.com/MSInSociety येथे फॉलो करू शकतील असेही कौशल्य विकास मंत्री यांनी यावेळी सांगितले.