गडचांदूर नगरपरिषदेचा अजब निर्णय, आठशे रुपयाच्या बॅनरवर बाराशे रुपयांचा कर



अबब! आठशे रुपयाच्या बॅनरवर बाराशे रुपयांचा कर
गडचांदूर नगरपरिषदेचा अजब निर्णय
चंद्रपूर. 
येत्या नऊ जानेवारीला गडचांदूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीत उमेदवारांनी बॅनरद्वारे प्रचार करण्याची तयारी चालवली आहे. मात्र बॅनरवर नगरपरिषदेने अव्वाच्या सव्वा दर लावल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली आहे.
         आठशे रुपये किंमतीच्या बॅनरवर बाराशे रुपयांचा कर नगरपरिषद आकारत आहे. त्यामुळे कोणत्या नियमांच्या आधारावर नगरपरिषद इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिरात कर आकारत आहे. असा प्रश्न सर्वसाधारण उमेदवार करीत आहे.
       जिल्ह्यातील भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, मुल, ब्रह्मपुरी व इतर कोणत्याही नगरपरिषदेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिरात कर नाही. गडचांदूर नगरपरिषदेने आकारलेला जाहिरात कर अन्यायकारक असून गरीब उमेदवारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम भरायची कुठून? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक अपक्ष उमेदवारांकडे एकीकडे बॅनर छापण्यासाठी पैसे नसताना दुपटीने नगर परिषदेमध्ये जाहिरात कर भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
          
    नगरपरिषद सभासदांच्या सभेमध्ये शहरामध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस लावण्यात येणाऱ्या बॅनरवर प्रति स्क्वेअर फिट १५ रुपये दर आकारण्याचा ठराव घेण्यात आला आहे.  त्यामुळे आम्ही सदर ठरावाची अंमलबजावणी करीत आहो.
- डॉ. विशाखा शेळकी
मुख्याधिकारी



नगरपरिषदेने घेतलेला ठराव सर्वसामान्य उमेदवारांच्या खिशाला कात्री लावणारा व अन्याय करणारा असून ज्यामुळे अनेक गरीब उमेदवार निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. मुख्याधिकारी यांनी सदर ठरावाची अंमलबजावणी न करता नियमानुसार जाहिरात कराची अंमलबजावणी करावी. त्यासाठी त्यांनी इतर नगरपरिषदांचा आदर्श घ्यावा.

- विक्रम येरणे, उमेदवार प्रभाग ३