गावागावातील गरजूंना मदत करण्यासाठी प्रशासनाचे कान -डोळे व्हा : शिवानी वडेट्टीवार
*चिमूर तालुक्यमधील अनेक गावात अन्नधान्याचे किट वाटप*
चंद्रपूर दि ११ एप्रिल : जिल्ह्यामध्ये संचारबंदी असताना आपल्या परिसरातील कोणती जनता अडचणीत असेल याची माहिती राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना असतेच. अशावेळी प्रत्यक्ष बाहेर न पडता प्रशासनाला दूरध्वनीद्वारे योग्य माहिती देऊन परिसरात कोणाची उपासमार होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या महासचिव शिवानी विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर,खडसंगी, मासळ, नेरी, भिसी या गावात भेट देऊन त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या सामानांची किट गरजूंना उपलब्ध करून दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना संदेश देताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शिवानी कन्या आहेत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील रेशन कार्ड नसणाऱ्या व अन्य ठिकाणावरून जिल्ह्यात कामानिमित्त आलेल्या निराश्रित 40 हजार कुटुंबाना किमान पंधरा दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याचा पुरवठा करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यांनी ब्रह्मपुरी,सावली,सिंदेवाही ,चंद्रपूर, घुग्घुस, आदी परिसरात त्यांनी याचे वाटप केले आहे. याच मोहिमेअंतर्गत आज चिमूर तालुक्यातील काही गावांमध्ये त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना विशेषतः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गावातील गरीब, गरजू निराश्रित, बेघर,लोकांची माहिती निश्चित असते. अशावेळी जेव्हा आपल्याला देखील घराच्या बाहेर पडणे धोकादायक आहे. प्रशासनाची देखील आपल्या परिवाराच्या व आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने परवानगी नाही आहे. त्यावेळी घरी बसूनच कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील घरात चूल पेटली की नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने व योग्य रीतीने काम करत आहे. मात्र अशावेळी त्यांच्या सोबतीला आपणही आपल्या माहितीची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कुणी उपाशी राहणार नाही याची खात्री पटेल. यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आवश्यक दूरध्वनीवर योग्य ती माहिती देऊन मदत करावी असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आपण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी देखील चर्चा केली असून जिल्हाभरातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या काळात प्रशासनाचे कान-डोळे होण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
चिमूर तालुक्यातील चिमूर, खड़सिंगी, मासळ,नेरी, भिशी या गावात त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले. यावेळी जि.प.सदस्य गजानन बुटके, जि.प. सदस्य ममताताई डुकरे, नगरसेवक कल्पनाताई इंदुरकर, सिमाताई बुटके, सचिन पचारे,सुनील धाबेकर, राजूभाऊ हिंगणकर, उपविभागीय अधिकारी शंकपाल, तहसीलदार संजय नागतिलक, उपस्थित होते.