चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड, जिल्हा प्रशासन




चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड, जिल्हा प्रशासन 

कोरोना विरुद्धच्या लढाईत घराघरातून साथ देण्याचे प्रशासनाचे आवाहन
सोमवारपासून संजय गांधी योजनेतून अनुदान वाटपाला सुरुवात

✨ चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ 118 व्यक्ती संस्थात्मक कॉरेन्टाइन ;७८ अहवाल निगेटिव्ह
✨ केशरी शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल करणे सुरू करावी
✨ शारीरिक दूरी पाळत शेतकरी, शेतमजूर यांनी कामे करावी
✨ बियाणे खतांसाठी कृषी केंद्र सकाळी १० ते ५ सुरू राहतील
✨ मोबाईल रिचार्जची दुकाने सकाळी ७ ते २ सुरू राहतील
✨ खरीप कर्ज वाटपासाठी स्टॅम्प पेपर बँकेतच मिळणार
✨ ट्रॅक्टर व कृषी अभियांत्रिकी संदर्भातील दुकाने सुरू
✨ धार्मिक, सण,उत्सवांमध्ये एकत्रीकरणाला मज्जाव
✨ मास्कचा वापर अनिवार्य, दोनशे रुपये दंड सुरू
चंद्रपूर दि. 24 एप्रिल :
 महाराष्ट्रासह देशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्यामुळे गाफील न राहता पुढील आदेशापर्यंत गरज नसेल तर बाहेर पडू नका. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे माहिती लपविल्याने, आदेश न पाळल्याने, स्वतःला व जिल्ह्याला धोक्यात घालू नका. प्रत्येक घराघरातून यासाठी प्रशासनाची साथ देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज जिल्हावासियांशी व्हिडिओ संवादाद्वारे संपर्क साधला. एक पॉझिटिव्ह रुग्ण शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आणू शकतो. त्यामुळे अन्य शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती न घाबरता प्रशासनाला द्या. तपासणी करून घ्या. घरातच रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोबतच खरीप हंगामासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रशासनाने केल्या असून या वर्षी मान्सून नियमित असल्याने शेतकऱ्यांनी शारीरिक अंतर ठेवून खरीप पूर्व हंगामाची तयारी करावी. शेतकऱ्यांना शेतात करायच्या नियमित कामांमध्ये कोणताही अडथळा नाही. खते, बियाणे, याची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांना सकाळी दहा ते पाच सुरू राहण्याची परवानगी दिली आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज घेण्यासाठी बँकेतच स्टॅम्प उपलब्ध करण्यात आले आहे. ट्रॅक्टर व शेती अवजारे दुरुस्त करणाऱ्या सर्व दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवत शेतीची सर्व कामे सुरू करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
तथापि, हे करीत असताना मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, परस्परांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. धार्मिक, पारंपारिक, लग्न, तेरवी वाढदिवस, सण-उत्सव यात गर्दी होणारच नाही, असे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान सर्व तालुक्यांना आज जमा झाले आहे. जिल्ह्यातील ९ हजार लाभार्थ्यांना सोमवारपासून याचा लाभ मिळणार आहे. मात्र बँकेत यासाठी एकाच वेळी झुंबड करू नये. गावातील आपले सरकार सेतू केंद्र व व बँकेमध्ये अंतर राखून व्यवहार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    मोबाईल रिचार्जची दुकाने सुरू करण्यात आली असून 7 ते 2 या काळात ती सुरू राहतील. जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकावर देखील अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. जिल्हयाच्या २१ लाखाच्या लोकसंख्येमध्ये 15 लाख लोकांपर्यंत अन्नधान्य सार्वजनिक वितरण प्रणालीतून पोहोचत आहे. मात्र केशरी शिधापत्रिकाधारकांना मानसी 8 रुपये किलो दराने 3 किलो किलो गहू व प्रति व्यक्ती 12 रुपये किलो दराने दोन किलो तांदूळ वितरित केले जाणार आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनी आपले अन्नधान्य रेशन दुकानातून उचलावे. केशरी शिधापत्रिकाधारकांना हे अन्नधान्य मोफत नाही.
     चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या नातेवाईक व कौटुंबिक सदस्यांना 3 मेपर्यंत जिल्ह्यात येऊ नये, असा संदेश द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.