पुढील आदेश येईपर्यंत विनापरवाना कोणतीही दुकाने उघडू नका : जिल्हाधिकारी खेमनार




पुढील आदेश येईपर्यंत विनापरवाना कोणतीही दुकाने उघडू नका : जिल्हाधिकारी खेमनार

3 मे पर्यंत लॉक डाऊन काटेकोर पाळण्याचे प्रशासनाचे आदेश
✨ जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ 80 नागरिकांचा अहवाल निगेटीव्ह
✨ ज्यांना परवानगी तीच दुकाने उघडावी
✨ धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली जमाव नको
✨ मनपाच्या परवानगीशिवाय अन्नधान्याचे वाटप नको
चंद्रपूर दि. २५ एप्रिल : 
जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तसेच केंद्रीय गृह विभागाने काही सूचना दिल्या असल्यामुळे लॉक डाउनमध्ये शिथीलता आली,असे समजायचे कारण नाही. राज्य शासनाकडून अधिकृत आदेश आल्याशिवाय ज्यांना लिखित परवानगी दिलेली नाही. अशा कोणत्याही व्यापारी प्रतिष्ठानाना उघडू नये. जिल्ह्यातील लॉक डाऊन 3 मेपर्यंत कायम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे
        लॉक डाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांसाठी जारी केलेल्या आजच्या व्हिडीओ संदेशमध्ये काही ठिकाणी परस्पर दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. लॉक डाऊनमध्ये कोणतीही शिथिलता दिल्या गेलेली नाही.त्यामुळे लिखित परवानगी दिल्या गेलेल्या व्यापारी प्रतिष्ठानाशिवाय अन्य दुकाने उघडण्यात येऊ नये. राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर व जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भात लेखी आदेश दिल्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
       चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र नागपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील असून कोणीही प्रवेश केल्यास 14 दिवस कॉरेन्टाईन करण्यात येत आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून आत मध्ये एकही चूक होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे स्पष्ट केले आहे.
      गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचे, कशा पद्धतीने व्यवस्था करायची, यासाठी आज चंद्रपूर शहरातील तीन प्रभागांमध्ये रंगीत तालीम करण्यात आली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध भागात देखील मॉक ड्रिल अर्थात रंगीत तालीम करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले होते. मात्र शहरात रुग्णांची वाढ झाल्याची अफवा काहींनी पसरवली असून अशा लोकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
      शासनामार्फत निराश्रित, निराधार लोकांना जेवण पुरविल्या जाते. शिव भोजन योजनेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे .सोबतच आता केशरी शिधा कार्ड असणाऱ्या जनतेलाही अन्नधान्य पुरविल्या जात आहे. शहरात कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मात्र तयार अन्न किंवा अन्नधान्याची किट वाटप करण्याचे अधिकार फक्त महानगरपालिकेला शहरात दिले असून अन्य ठिकाणी राज्य शासनाचे कर्मचारी याबाबत काम करीत आहे. त्यामुळे कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने यासाठी गोंधळ घालू नये, शहरात संचारबंदी सुरू असून अशा वेळी संचारबंदीचे नियम तोडल्यास आवश्यक कलमान्वये गुन्हे दाखल केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका व शासनाच्या यासंदर्भातील दूरध्वनीवर माहिती देण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात या काळातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे ही त्यांनी सांगितले. कोरोना आजार संपर्कातून येतो त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अतिशय अनिवार्य आहे. त्यादृष्टीने सण उत्सव साजरे करताना लक्ष ठेवावे. 3 मेपर्यंत लॉक डाऊन कायम असून आतापर्यंत  जनतेने अतिशय संयमाने सहकार्य केले असून यापुढे देखील अशीच अपेक्षा राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.