बारा बलुतेदार समाज घटकाला न्याय मिळवून देऊ !: नाना पटोले





बारा बलुतेदार समाज घटकाला न्याय मिळवून देऊ !: नाना पटोले

दिनचर्या न्युज :-

मुंबई, दि. ८ सप्टेंबर २०२१
राज्यातील बारा बलुतेदार समाज घटकाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांच्या मागण्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा करुन या समाज घटकाला न्याय मिळवून देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
गांधी भवन येथे बारा बलुतेदार महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमी तत्पर असून बारा बलुतेदारांच्या समस्यांबाबत यापूर्वीही चर्चा झाली आहे. आज अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु आणि या समस्या मार्गी लावू. समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीतही ओबीसी तसेच बारा बलुतेदार समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढेही या समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहिल. विधानसभेचा अध्यक्ष असताना ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा ठराव करुन देशात आदर्श घालून दिला त्यानंतर इतर राज्यांनीही तशीच मागणी लावून धरली. ओबीसी समाजाची जनगणना केल्यास अनेक समस्यांच्या मुळापर्यंत जाता येईल. निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय पक्ष प्रलोभणे दाखवतात त्यांना मात्र बळी पडू नका असे आवाहनही पटोले यांनी केले.
बारा बलुतेदारांचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, बारा बलुतेदार, भटके विमुक्त, एसबीसी व मुस्लीम ओबीसींच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ५० टक्के जागा आरक्षित ठेवणे, बारा बलुतेदार कुशल कारागिरांच्या व्यवसायास लघु उद्योगाचा दर्जा देऊन अल्पदराने कर्ज उपलब्ध करुन देणे, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत आदी मागण्यांचे निवेदन बारा बलुतेदार महासंघाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केले.


दिनचर्या न्युज