भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक प्रेरणादायी केंद्र ठरावे – आ. सुधीर मुनगंटीवार
*चंद्रपूर शहरात भगवान बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरण व स्मारकाचा भूमीपूजन सोहळा संपन्न.
दिनचर्या वृत्तपत्र
चंद्रपूर :-
विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भगवान बिरसामुंडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरराष्ट्रीय जनजाती दिवस घोषीत करून त्यांना ख-याअर्थाने आदरांजली दिली आहे. चंद्रपूरच्या महापौरांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या महत्वाच्या विकासकामांपैकी भगवान बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे काम आहे. आदिवासी बांधवांनी या कामाचा पाठपुरावा करावा असे माझे त्यांना नम्र आवाहन आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे हे स्मारक आपल्याला प्रेरणा देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी चंद्रपूर शहरात रेल्वे स्टेशन नजिकच्या बीएसएनएल कार्यालयाजवळ भगवान बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरण तसेच स्मारक उभारणीच्या कामाच्या भूमीपूजन सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, सौ. जयश्री जुमडे, सौ. पुष्पा उराडे, शितल कुळमेथे, आदिवासी नेते अशोक तुमराम, नगरसेविका चंद्रकला सोयाम, माया उईके, ज्योती गेडाम, शितल आत्राम, प्रकाश धारणे, धनराज कोवे, रवि आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, प्रदिप किरमे, जयप्रकाश खोब्रागडे, राजू भगत, रवि लोणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मी अर्थमंत्री असताना मिशन शौर्यच्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर केले. आदिवासीबांधव प्रामाणिक व जिद्दी आहे. एकलव्य हे त्याचे उत्तर उदाहरण आहे. आदिवासीबहुल ग्रामपंचायतींना बजेटच्या ५ टक्के निधी थेट देण्याचा निर्णय आमच्या सरकारच्या काळात आम्ही घेतला होता. १८५८ च्या स्वातंत्र्य लढयात ब्रिटीशांशी निकराने झुंज देणारे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी मी केंद्र सरकारशी यशस्वी संघर्ष केला. शहरातील ज्युबिली हायस्कुल परिसरात शहीद बाबुराव शेडमाके इनडोअर स्टेडियम बांधकामासाठी निधी मंजूर करविला. भारतीय जनता पार्टीने आदिवासी बांधवांचे हित नेहमी जपले आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे हे स्मारक आधुनिक क्रांती ठरो अशी अपेक्षा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला आदिवासी बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
दिनचर्या न्युज