विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम अभिनंदनीय : मकरंद अनासपुरे
ग्राम वाचनालयातून गावागावात वाचन संस्कृतीला बळ मिळणार*
- *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार*

*स्पर्धेच्या माध्यमातून निवडला जाणार वाचनाचा कोहिनूर*

विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम अभिनंदनीय : मकरंद अनासपुरे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 15:
ग्रामीण भागात वाचन संस्कृती विकसित व्हावी, गावागावात वाचनासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात 10 वाचनालये या कल्पनेतून दीडशे ग्राम वाचनालये निर्माण करण्यात आली असून यामुळे ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला बळ मिळणार आह़े असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मिशन कोहिनूरमध्ये वाचन स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्याचा वाचनातील कोहिनूर निवडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

150 ग्राम वाचनालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु. वायाळ, राहुल पावडे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, महाराष्ट्राबाबत बोलताना "चांद्यापासून बांद्यापर्यंत" असे वर्णन केले जाते; महाराष्ट्राच्या वर्णनाचा प्रारंभ हा चांद्यापासून केला जात असेल तर महाराष्ट्रात आपला जिल्हा नेहमी अग्रेसर राहावा, या दृष्टीने जिल्ह्यात नवनवीन उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून "माझी अभ्यासिका" अभियानाचा अतिशय उत्तम उपक्रम जिल्ह्यात सुरू केला आहे. वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड व गोडी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर बल्लारपूर फॉर्म भरणा व मूल येथील वाचनालयात दीड हजार विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. यातील अनेक विद्यार्थी आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन केवळ परिवाराची जबाबदारी सांभाळत नाहीत तर समाजाची सेवादेखील करण्याचा संकल्प करतात. या अगोदर कृषी वाचनालये तसेच 1500 ई-लर्निंग स्कूल तयार केल्या केल्या. सामाजिक जाणीव ठेवून देशाच्या प्रगतीत योगदान देत राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करणारा विद्यार्थी या वाचनालयातून घडवायचा आहे असेही ते म्हणाले .
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मिशन कोहिनूर मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूरचा त्या त्या क्षेत्रातील कोहिनूर निवडला पाहिजे. यासाठी विज्ञान, वक्तृत्व, परिसंवाद, चर्चा तसेच ऐतिहासिक स्पर्धांची मांडणी करावी व वर्षांमध्ये किमान सहा जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावेळी उपक्रमाचे कौतुक करुन, विद्यार्थी जीवनात  वाचन संस्कृतीचे महत्व पटवून देण्यासाठी शासकीय स्तरावर तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे अभिनंदनीय आह़े असेही ते म्हणाले.