चंद्रपूरात शिवप्रेमी उतरले रस्त्यावर, निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपुरकर शिवप्रेमींची सरकारच्या विरोधात शिवगर्जना
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणातील अवमानाच्या विरोधात हजारो शिवप्रेमी उतरले रस्त्यावर
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या विरोधात चंद्रपुरात आम्ही शिवप्रेमी चंद्रपूरकर या बॅनरखाली आयोजित निषेध मोर्चाला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारो शिवप्रेमी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. विविध सामाजिक संस्था सोबतच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उस्फुर्त सहभाग होता.
चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिव शिल्पाला अभिवादन करून दुपारी बारा वाजता निषेध मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रस्थानी महिला शिवप्रेमी हातात निषेधाचा बॅनर घेऊन या मोर्चाचे नेतृत्व करत होत्या. त्यानंतर लोकप्रतिनिधी व राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्यांनतर सर्व शिवप्रेमी नागरिक अश्या पद्धतीने मोर्चाची रचना होती.
निषेध मोर्च्यात स्वयंस्फूर्तीने सामील झालेल्या शिवप्रेमींनी "निषेध असो, निषेध असो, शिवद्रोही सरकारचा निषेध असो" , "छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो" "मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री राजीनामा दो, राजीनामा दो" "छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही", "छत्रपतींच्या सन्मानात, शिवप्रेमी मैदानात" "जय जिजाऊ जय शिवराय" "जय भवानी जय शिवाजी" "छत्रपती शिवाजी महाराज की जय" "शिवस्मारक जमिनीवर झालेच पाहिजे " शिवद्रोही सरकार होश में आव" अश्या घोषणांनी चंद्रपूर शहर दणाणून सोडले.
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाऊन सभेत मोर्चाचे रूपांतर झाले यावेळी निषेध मोर्चा आयोजकांच्या वतीने काही शिवप्रेमींनी प्रतिनिधी स्वरूपात भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये मोर्चाची भूमिका विशद करताना, प्रा. दिलीप चौधरी यांनी मोर्चाचे आयोजन का व कशासाठी केले याची माहिती देऊन या शिवद्रोही सरकारने मोर्चाच्या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास जगभरातील शिवप्रेमी रस्त्यावर उतरेल असा सरकारला इशारा दिला. बंडू धोत्रे महाराजांचे विचार रयतेचे राज्य निर्माण करणारे आणि अठरा पगड जातीला एकत्रित करणारे असल्याने हा अवमान निषेधार्थ आहे. सुनील मुसळे म्हणाले, महाराजांनी बांधलेले किल्ले कधी पडले नाही पण महाराजांचा पुतळा सात महिन्यात कोसळला हे दुर्दैवी घटना तसेच महायुतीचे नेते जे वाचाळ वक्तव्य करीत नाही ते कुठेतरी थांबले पाहिजे.
संदीप गिरहे यांनी शिवद्रोही सरकारचा निषेध व्यक्त करत तोडफोडीचे राजकारण करणारे सरकार यांच्या हातून गलथान नियोजनामुळे आता महापुरुषांचे पुतळे देखील सुटले नाही असे विचार मांडले. बेबीताई उईके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध व्यक्त केला. प्रा. माधव गुरूनुले यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान आजपासूनच नाही तर राज्याभिषेकापासूनच सुरू आहे तीच श्रृंखला पुढे ठेवल्यामुळे सरकारचा निषेध व्यक्त केला. बाळूभाऊ खोब्रागडे यांनी छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आमदार सुधाकर अडबाले यांनी मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झालेला आहे ज्याप्रमाणे हा पुतळा कोसळला त्याचप्रमाणे इथल्या कमिशनखोर सरकारलाही कोसळावा लागेल छत्रपतींचा अपमान महाराष्ट्रातील शिवप्रेमी सहन करणार नाही अशा भावना व्यक्त केल्या. आमदार सुभाष धोटे यांनी पुतळा कोसळल्याबद्दल तीव्र शब्दात सरकारचा निषेध करून या संदर्भाने जबाबदार असलेल्या जयदेव आपटे व त्याच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करून राष्ट्रवादीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सातत्याने या देशातील एक विचारसरणी करत आलेली आहे याच विचारसरणीचे प्रतिनिधी म्हणून पुतळा कोसळण्यास जबाबदार असणारा जयदेव आपटे असो की, मुलींवरील लैंगिक अत्याचाराला जबाबदार असणाऱ्या संस्थेच्या संस्थाचालक आपटे असो हे सगळे आपटेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला. यापुढे कोणत्याही महान महापुरुषाचा अपमान झाल्यास जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अशा आशयाची शपथ यावेळी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांनी सामूहिकरीत्या घेतली या समारोपीय सभेचे संचालन विनोद थेरे तर आभार प्रदर्शन मोहम्मद शरीफ यांनी केले. मंच सजावटीची जबाबदारी दिलीप रीगणे यांनी सांभाळली.
शिवप्रेमींचे निवेदन स्वीकारण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी मोर्चा स्थळी येऊन शिवप्रेमी कडून निवेदन स्वीकारले.
मोर्चाचा समारोप सर्व मोर्चेकरांनी उभे राहून राष्ट्रगीताने करण्यात आला या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर शहरातील विविध संस्था संघटना पदाधिकारी शिवप्रेमी बंधू-भगिनींनी गेल्या सात दिवस प्रचंड परिश्रम घेतले.
शिवप्रेमी बुरखेधारी मुस्लिम महिलांच्या उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला
शिवरायांच्या नावावर समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजविघातक विकृतींना या मोर्चामध्ये उपस्थित शिवप्रेमी मुस्लिम महिलांच्या उपस्थितीमुळे चांगली चपराक बसली असून छत्रपतीच्या सन्मानात जात-पात धर्माच्या पलीकडे जाऊन शिवप्रेमी एकत्रित झाल्याचे दिसले.