वाडीत निवासी भागात जड वाहनांची वर्दळ


विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रशासन मात्र निद्रावस्थेतस्थानिक,पालक,शिक्षक,विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात


वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे
वाडी शहर गोदामाची नगरी म्हणून प्रसिध्द असली तरी आता हीच प्रसिद्धी स्थानिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ निर्माण झाली आहे. नगर परिषद प्रशासन बांधकाम परवानगी देताना कोणतीही चौकशी न करता सर्व नियम धाब्यावर ठेवून लोकवस्ती असलेल्या भागात गोडावून बांधकामाची परवानगी देता येत नसतांनाही डोळे मिटून मागेल त्याला बांधकाम परवानगी देण्याचा विचित्र उपक्रम सुरू केल्याने या देवाणघेवाणीत लक्ष्मी दर्शनाचा प्रकार तर झाला नाहीना अशा शंका कुशंका स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या बाबतीत लोकांच्या मनात निर्माण झाल्या आहेत.परंतु याचा परिणाम स्थानिक रहिवाशी व या परिसरातील कार्यरत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असला तरीही आपल्याला काहीही सोयरेसुतक नसल्यासारखे प्रशासन वागत असल्याचे चित्र दिसत आहे.सकाळी ७ वाजतापासून तर सायंकाळी उशिरापर्यंत गोडावून मध्ये येणाऱ्या जड वाहनांची सतत वर्दळ राहत असल्याने या भागात संभाव्य मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.स्थानिक प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना न केल्यास विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक,तसेच स्थानिक नागरिकानी विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून स्थानिक नगर परिषद विरोधात आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. नगर परिषद वाडी अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक एक मधील कोहळे ले आउट तसेच याच भागाला लागून असलेल्या विकास नगर,शाहू ले आउट,सारिपुत्र नगर,खडगांव रोडच्या बाजूला असलेल्या रहिवासी भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गोदामाचे बांधकाम झाले आणि ते भाड्याने दिले असल्याने परिणामी जड वाहनांची वर्दळ वाढली त्यामुळे वाहतुकीच्या संदर्भात अनेक प्रश्न आणि अनेक संभाव्य धोके निर्माण झाले आहे. मागील कित्येक वर्षांपासून या भागात इन्फन्ट कॉन्व्हेंट व कनिष्ठ महाविद्यालय,विमलताई तिडके विद्यालय, प्रगती विद्यालय, शासकीय अंगणवाडी आजघडीला विद्यादानाचे कार्य करीत असून मोठ्या संख्येनी विद्यार्थी शिकत आहेत.तसेच याच परिसराच्या बाजूला प्रबोधनकार ठाकरे विद्यालय,गुरुप्रसाद प्राथमिक शाळा,ज्ञान विद्या मंदिर,शिशु मंदिर,एंजल किड्स कॉन्व्हेंट व ज्युनियर कॉलेज,तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे.या परिसरातील अंतर्गत रस्त्यावरुन विद्यार्थी,महिला,वृद्ध यांना जाणे-येणे करावे लागते,त्यातच निवासी भागात वाढती वेगवेगळ्या कंपनीच्या वस्तूच्या गोदामाची संख्या यामुळे जड वाहनाच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो तर या भागात निवास करणाऱ्यांना आपली मुले खेळायला घराबाहेर सोडणे कठीण झाले आहे.गोदामातुन मालाची उचल किंवा मालाची उतार करण्यासाठी येणारे मोठे ट्रक केंव्हा शाळेत,किंवा परिसरातील घरात घुसतील याचा अंदाज नाही,रस्त्यावर मोठी ट्रक उभे राहत असल्याने बऱ्याचदा रस्ता जाम होतो.याबाबत ट्रक चालकांना बोलले तर वाद घालून वेगवेगळी कारणे पुढे करतात .गोदाम मालकांना भरपूर प्रमाणात भाडे मिळत असल्याने ते मुग गिळून आहे,प्रशासन व गोदाम मालक यांचे काही साटेलोटे तर नाहीना असा प्रश्न निर्माण होतो.गोदामात काम करणाऱ्या कामगाराचा आवाज व अभद्र भाषेतील संवाद याचा विपरीत परिणाम लहान मुलांवर पडतो यासर्व प्रकाराने स्थानिकात, शिक्षक,व पालकांमध्ये भिती निर्माण होऊन दहशत सावट पसरले आहे.हा प्रकार स्थानिक प्रशासनाचे लक्षात न येणे ही शोकांतिका आहे.किंवा काय गौडबंगाल आहे,प्रशासन कार्यवाही का करीत नाही ? विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांच्या जिवापेक्षा हे गोदाम मालक महत्त्वाचे आहेत काय?या जीवघेण्या जवलंत समस्येवर तोडगा काढून परिसरातील जड वाहनांची रहदारी त्वरित बंद करावी.अन्यथा
स्थानिक नागरिक,पालक,शिक्षक यांच्यासह विद्यार्थी स्वतःच्या संरक्षणासाठी रस्त्यावर येऊन नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.