धक्कादायक:भावासमोरच वाघाने बहिणीला नेले फरफटत

ललित लांजेवार:

सख्या भावासमोर बहिणीला वाघाने फरफटत नेल्याची धक्कादायक तसेच दुखद घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका येथील जोगापुर-खांबाडाच्या जंगलात घडली. वर्षा तोडासे ४५ असे हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
 वर्षा आपला भाऊ मनोज शेडमाके (३०) व सासू अनुसया तोडासे (६०) यांच्या सोबत  राजूरा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र 177 मध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजता जंगलात झाडूच्या शिलका शोधण्यासाठी गेले होते.हे तिघेहि जन एकमेकांच्या जवळपासच होते.त्याच झुडपात वाघ दबा धरून बसला होता. अन संधी मिळताच त्याने वर्षावर हल्ला केला.वाघाने हल्ला करताच वर्षा ओरडली तितक्यात हाकेच्या अंतरावर असलेल्या भावाने दंडा घेऊन पाठलाग केला.भावाने वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न प्रयत्नच राहिले. अन वाघ भावाच्या समोरच बहिणीला फरफटत घेऊन गेला. भेदरलेल्या मृत बहिणीचा भाऊ आणि सासू यांनी त्याच परीस्थित गाव गाठले. व गावातील प्रत्तेकाला त्याची माहिती सांगितली. हि बाब वनविभागाला सांगण्यात आली.तत्काळ वन विभागाचे राऊंड ऑफिसर एस.एम. खट्टु आपला ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.सोबतच राजुऱ्याचे तहसीलदार रविंद्र होली देखील घटनास्थळी दाखल झाले.

वनाधिका-यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृदेह ताब्यात घेतला. मृत महिलेच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत देण्याची कारवाई सुरु केली,वाघांचे वाढते हल्ले चंद्रपूर जिल्ह्यासाठी शेतकरी व गावकरयांसाठी   डोकेदुखी ठरत आहेत.

गेल्या काही वर्षांत वाघांच्या वास्तव्यक्षेत्राचा संकोच झाला असून छोट्या भागात त्यांना अधिक संख्येने राहावे लागते. त्या तुलनेत मानवी लोकसंख्या मात्र वाढत आहे. मानवी विकासामुळे वाघांच्या वास्तव्याचेही विभाजन झाले आहे. त्यातून मानवाचे वास्तव्य वाढत असल्याने मानव आणि वन्यजीवांतील संघर्ष वाढण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. वाघांच्या माणूस अथवा जनावरे यांच्यावरील हल्ल्यामुळे लोकांमध्ये संताप व असंतोष वाढतो. त्यातून वाघांना पकडणे अथवा त्याची हत्या करण्याचे प्रकार घडतात. वाघांना ठार करण्याची कृती बेकायदा आहे. त्याशिवाय वाघांच्या हल्ल्यातून निर्माण झालेल्या संघर्षाचा आणखी वेगळा परिणाम झाला आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे वाघांचे संरक्षण व जतन करण्याच्या मोहिमेला लोकांचा पाठिंबा कमी होतो आहे.