धक्कादायक:नागपुरात मतिमंद मुलीवर बलात्कार

आरोपी नातेवाईक फरार
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:

पाहुणे म्हणून नातेवाईकाकडे आलेल्या दोन आरोपीनी मतिमंद पणाचा फायदा घेत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केल्याने मतिमंद मुलगी गर्भवती राहील्याची घटना घडल्याच्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दवलामेटी मधील हिल टॉप कॉलनीतील फिर्यादी मंजू रेडी या आपल्या दोन मुली व एका मुलासह राहत असून २०१८ मध्ये फिर्यादीचा चुलत भाऊ व्यंकटेश पसपलेटी राहणार तेलंगणा हा परिवारासह फिर्यादीकडे आला व बरेच दिवस मुक्कामाने राहीला.फिर्यादीची मोठी मुलगी गरोदर असल्याने तिचे सर्व लक्ष मोठ्या मुलीकडे होते.या संधीचा फायदा घेत आरोपीने २५ वर्षीय मतिमंद मुलीवर बळजबरीने बलात्कार केला .तिला व्यवस्थित बोलता येत नसल्याने ती हा प्रकार आईला सांगू शकली नाही याचा फायदा घेत आरोपी व्यंकटेश वारंवार शारीरिक संबंध ठेवत गेला.याच कालावधीत फिर्यादी आईचा दुसरा नातेवाईक आरोपी रामू गोपाल बुई वय २९ राहणार उस्मानाबाद याचे नेहमी येणे-जाणे होते.
आरोपी व्यंकटेश हा एकदा मतिमंद मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दिसला असता हा प्रकार मुलीच्या आईला सांगतो ,नाहीतर मलाही शारीरिक संबंध करू दे.असे व्यंकटेशला धमकावून आरोपी रामुनेही मतिमंद मुलीवर बलात्कार केला यानंतर दोघेही फिर्यादी आईच्या गैरहजेरीत मुलींवर सतत शारीरिक संबंध करीत होते.या दरम्यान मुलीच्या पोटाची वाढ होत असल्याचे आईच्या लक्षात येताच तिची सोनोग्राफी केली असता ती गरोदर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली घरगुती विषय असल्याने त्यावेळी बदनामीच्या भितीपोटी पोलिसात तक्रार केली नव्हती तसेच दोघांनाही हे कृत्य केल्याचे कबूल केले व यासाठी योग्यमार्ग काढून येणारा खर्चही करण्यास तयारी दर्शविली होती.आजच्या स्थितीत मुलगी ८ महिन्याची गरोदर असून गर्भपात शक्य नसून आम्ही हे कृत्य केले नाही असे म्हणत आरोपी आपल्या गावाला पसार झाले आहेत.

फिर्यादी आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भादवी कलम ३७६ , ५०६ , ३४ नुसार वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी पुढील तपास करीत आहे.