बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातुन चिचपल्‍लीचे नांव जागतिक स्‍तरावर लौकीकप्राप्‍त ठरेल – आ. सुधीर मुनगंटीवा

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातुन चिचपल्‍लीचे नांव जागतिक स्‍तरावर लौकीकप्राप्‍त ठरेल – आ. सुधीर मुनगंटीवार

बांबु हॅन्‍डीक्रॉफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट तसेच बांबु प्‍लाय युनिटचे उदघाटन संपन्‍न.


2013 मध्‍ये मी फक्‍त आमदार होतो. त्‍यावेळी बांबुवर आधारित उद्योग निर्मीतीसाठी मी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. 2014 मध्‍ये भाजपाचे सरकार सत्‍तारूढ झाल्‍यानंतर मंत्रीमंडळाच्‍या दुस-याच बैठकीत चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मंजूरी मिळाली, काम सुरू झाले व पूर्णही झाले. या केंद्रामुळे चिचपल्‍लीचे नांव जागतिक स्‍तरावर लौकीकप्राप्‍त ठरेल याची मला खात्री आहे. मी बघितलेले स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी ज्‍या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले त्‍या सर्वांचे मी अभिनंदन करतो. महिलांना याद्वारे उद्यमशील होता येईल व रोजगार मिळेल यासाठी मी यापुढील काळातही विशेष प्रयत्‍न करेल अशी ग्‍वाही माजी अर्थ तथा वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपूर तालुक्‍यातील चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज बांबु हॅन्‍डीक्राफ्ट व आर्ट युनिट तसेच बाबु प्‍लाय युनिटचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, माजी आ. प्रा. अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, रामपाल सिंह, जिल्‍हा परिषद सदस्‍य संजय गजपूरे, गौतम निमगडे, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातुन यापुढील काळातही मोठे काम आपल्‍याला करायचे आहे. जेव्‍हा आपण एखादा उद्योग सुरू करतो तेव्‍हा तो फक्‍त रोजगार निर्मीती करत नाही तर त्‍या माध्‍यमातुन त्‍या परिसराचा नावलौकीक सुध्‍दा वृध्‍दींगत होतो. बांबु पासून तिरंगा ध्‍वज, तलवार अशा विविध वस्‍तु तयार करण्‍यात आल्‍या. पहिला तिरंगा ध्‍वज मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांना मी भेट देवू शकलो याचा मला विशेष आनंद आहे. बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या बांबुपासून तयार होणा-या इमारतीची दखल सिंगापूरच्‍या प्रसार माध्‍यमांनी घेतली. विविध प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍काराचे मानकरी हे केंद्र ठरले ही बाब विशेष अभिमानास्‍पद आहे. गेल्‍या 5 वर्षाच्‍या कार्यकाळात वनविभागाच्‍या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी उल्‍लेखनिय असे काम करत वनविभागाला विशेष लौकीक प्रदान केला, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.

 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केंद्राचे संचालक राहूल पाटील यांनी केले. बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातुन बांबुच्‍या क्षेत्रात उल्‍लेखनिय कामगिरी करण्‍यात आल्‍याचे सांगत तत्‍कालीन वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात एक अद्वितीय उपक्रम या भागात आम्‍ही राबवू शकलो याचा विशेष आनंद असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.