सोमवारपासून लॉक डाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता कोरोनाचे सावट कायम ; नागरिकांनी घरातच रहावे : जिल्हाधिकारी.




सोमवारपासून लॉक डाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता
कोरोनाचे सावट कायम ; नागरिकांनी घरातच रहावे : जिल्हाधिकारी

🔵 आवश्यक सेवांची दुकाने 7 ते 2
⚫ अन्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2
🔘 रविवारी फक्त जिवनावश्यक दुकाने सुरू
🔘 दुचाकीवर केवळ १ नागरिकाला मुभा
⚫ रिक्षामध्ये मागच्या सीटवर फक्त दोन व्यक्ती
⚫ चार चाकी गाडी ड्रायव्हर आणि मागे दोन
⚫ जिल्हा अंतर्गत आता पासची गरज नाही
⚫ जिल्हा बाहेर प्रवास करता येणार नाही
⚫ बाहेरून येणारा 14 दिवस होईल
⚫ जिल्ह्यात 144 कलम यापुढेही कायम

चंद्रपूर दि ९ मे : महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. अनेक भागात अडकलेले नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचत आहेत. त्यामुळे आपण कोरोनाच्या सावटाखाली कायम आहोत. मात्र तरीही सोमवारपासून काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. जिल्‍ह्यात 144 कलम लागू असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये ,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी केले आहे.
राज्य शासनाने दोन मे रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील उद्योग व्यवसायांना काही प्रमाणात सुरू करण्याचे ठरले असून यामध्ये सोमवारपासून अंशत : बदल करण्यात आले आहे, पुरणा पासून जिल्हा धोक्याबाहेर असतांनाच ही शीतलता कायम राहील त्यामुळे वेळोवेळी शासन घेणाऱ्या निर्णयाकडे लक्ष असावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्हयामध्ये घेण्यात येणारे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मीक, क्रीडा विषयक प्रदर्शने व शिबीरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे आंदोलन, इत्यादी कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे. तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, देशांतर्गत व परदेशी सहली इ. यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील. दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, गुटखा-तंबाखु विक्री इत्यादी बंद राहील.

सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील

अंत्यविधी कमाल 20 व्यक्तीं पुरतीच मर्यादित राहील तसेच लग्नसमारंभाला संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या परवानगीने 50 व्यक्तीं पर्यंत परवानगी देण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेणे बंधनकारक राहील असे न केल्यास कार्यवाहीस पात्र राहील.

जिल्ह्यात अद्यापही कलम 144 पुढील आदेशापर्यंत लागूच राहणार आहे.

समाज माध्यमांद्वारे अफवा पसरविणे हा गुन्हा आहे. असे करणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. समाजामध्ये भीती निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारची बातमी व माहिती प्रसारित करू नये. शासन व प्रशासनाकडून आलेली अधिकृत माहितीच ग्राह्य धरावी.


जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येईल. या कंटेनमेंट झोन हा पूर्ण:ता सिल करण्यात येईल . यामध्ये कोणत्याही नागरिकाला आत येणे व बाहेर जाणे यात कोणतीच मुभा असणार नाही. आस्थापने ही कंटेनमेंट झोनच्या बाहेर सुरू करण्यात येईल. कंटेनमेंट झोनच्या आत मध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. इतर सर्व हालचाली व वाहतूक बंद राहतील.


जिल्ह्याच्या सीमा आजही बंद आहेत. आंतरराज्य व जिल्हा यांची मनुष्य वाहतूक याला पूर्णता बंदी आहे. केवळ राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनेच अत्यावश्यक कारणासाठी मनुष्य वाहतुकीला परवानगी राहील. मालवाहतुकीसाठी कुठलीही परवानगीची गरज नाही.

65 वर्षापेक्षा अधिक व्यक्तींना तसेच 10 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या बालकांना व गरोदर मातांना फक्त वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडण्याची परवानगी असणार आहे.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना संध्याकाळी 7 नंतर आणि सकाळी 7 पूर्वी बाहेर फिरण्यास मनाई असेल. यावेळी फक्त मालवाहतूक सुरू राहील.

अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व प्रकारची दुकाने उघडे करण्याची परवानगी असणार आहे. ही दुकाने सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.

  मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ही सोमवार ते शनिवार या दिवसांसाठी फक्त उघडे राहतील रविवारी ही दुकाने बंद राहतील. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे अधिकृत परवानाधारक फेरीवाले यांनादेखील अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी 7 ते 2 व बिगर अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ राहणार आहे.


कुठल्याही दुकानदारांना किंवा आस्थापनांना दुकानाच्या समोर किंवा फुटपाथवर सामान मांडता येणार नाही. आस्थापनांमध्ये व दुकानांमध्ये इतर कुठल्याही ठिकाणी
सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनीटायझर,हॅन्ड सॅनीटायझरची सुविधा उपलब्ध करून देणे, थर्मल स्कॅनिंग करणे या गोष्टी बंधनकारक राहतील. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती या क्षेत्रापुरते केवळ रिक्षाचालकांना परवानगी असणार आहे. यामध्ये रिक्षाचालक व केवळ 2 प्रवासी एवढीच प्रवासीची मुदत राहणार आहे. या प्रवासी क्षमतेचं उल्लंघन आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात  येईल.

दुचाकी वाहनावर केवळ 1 व्यक्तीला परवानगी राहील तसेच चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर 2 व्यक्ती म्हणजेच कमाल 3 व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. असे आढळून आल्यास पोलीस विभागांतर्गत कारवाई करण्यात येईल.

जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे उद्योग-व्यवसाय दुकाने यांना मुभा असणार आहे. या निर्देशाप्रमाणे जी सेवा, उद्योग-व्यवसाय दुकाने सुरू आहेत. त्यांना जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी कोणत्याही पासची यापुढे आवश्यकता राहणार नाही. आंतरजिल्हा वाहतुकीसाठी प्रशासनाची परवानगी व पास घेणे बंधनकारक राहील.

शहरी भागातील बांधकामे आहेत त्या ठिकाणचे कामगार त्याच ठिकाणी राहतील अशाच बांधकामांना परवानगी असणार आहे. इतर बांधकामांना परवानगी नसणार आहे.

ग्रामीण भागामध्ये सर्व प्रकारची बांधकामे सुरू राहण्यास परवानगी असेल.

विस्तृत आदेश जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर असणार आहे. या आदेशांचे सर्व संबंधित आस्थापना चालक, नागरिक यांनी आदेशांचे तंतोतंत पालन करावे.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झालेला असून नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या नागरिकांची नोंदणी करणे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बंधनकारक आहे.
अशा नागरिकांनी स्वतःहून माहिती देणे व 14 दिवस होम कॉरेन्टाईन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्तींना लक्षणे आढळून आले असतील तर अशा व्यक्तींनी तात्काळ रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. यासंदर्भात कुठलीही तक्रार असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन किंवा एकात्मिक रोग संरक्षण प्रकल्प नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर नोंदवावी.

दिनचर्या न्युज 

सलुन व्यवसायावर प्रशासनाकडून कानटोचनी, सलून दुकाने राहणार बंदच?