अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनी विकासाचा संकल्प करावा - वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार chandrapur
अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनी विकासाचा संकल्प करावा
- वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

◆ *जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम*

◆ *पायाभुत सुविधांची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करणार*

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 15 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे संकल्पाचे वर्ष असून या देशामध्ये एकही परिवार गरीब राहता कामा नये. देशातील प्रत्येक परिवाराला त्याचा हक्क मिळावा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार व आरोग्य या सेवा सहजपणे प्राप्त व्हाव्यात, त्या दृष्टीने सर्वांना संकल्प करावयाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

हजारो-लाखो शहिदांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला व देशासाठी बलिदान दिले त्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो, असे सांगून मंत्री श्री. मुनंगटीवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील साधारणतः 5 लक्ष कुटुंबांनी तिरंगा फडकवत अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र होतांना हजारो-लाखो शहिदांनी आपल्या प्राणांची आहुती देताना स्वतःच्या परिवाराची चिंता केली नाही. कन्याकुमारीपासून तर कश्मीरपर्यंत अशा भारतमातेच्या सुपुत्राच्या परिवाराचे स्वप्न पूर्ण व्हावे, देश सुजलाम-सुफलाम व्हावा, समृद्ध व्हावा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुख व समाधान असावे हे स्वप्न घेऊन अनेक शहीद हसत-हसत फासावर गेले.

18व्या शतकापासून इंग्रजांच्या माध्यमातून देशामध्ये दूरध्वनी व भ्रमणध्वनी करतांना ‘हॅलो’ हा शब्द वापरला जातो. आता यापुढे हॅलोचा उपयोग न करता “वंदे मातरम” म्हणायचे आहे. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचे आहे. अभियान तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा जनतेचा स्वयंस्फूर्तीने पाठिंबा असतो. या जिल्ह्याची जबाबदारी म्हणून निश्चितपणे या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन योगदान द्यायचे आहे. अनेक जातीपंथाच्या लोकांना एका सूत्रात बांधण्याची शक्ती व ताकद या तिरंगा ध्वजात आहे. पूर परिस्थितीने हजारो कुटुंब विस्थापित झाले, संकटात सापडले आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला न्याय दिला पाहिजे त्यांच्या संकटात सरकार पाठीशी उभे आहे. त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने संकल्प केला आहे.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, भविष्यात या जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण व कृषी क्षेत्र अशा महत्वाच्या विषयावर सर्व तालुक्यात प्रगती करण्याच्या संकल्प केला आहे. जी कामे अर्धवट राहिली ती वेगाने पूर्ण करण्याचा मानस आहे. यात सर्व बसस्थानके, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, महाकाली मंदिर आदींचा समावेश आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अजयपुरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध शेती करण्याच्या दृष्टीने सीएसआर फंडातून 10 कोटी रुपये मंजूर केले. अजयपुरमध्ये दहा एकर जागेमध्ये नवीन कृषी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना अतिशय आधुनिक तंत्रज्ञान देण्याच्या कामाला सुरुवात होत आहे. बॉटनिकल गार्डनचे काम त्वरीत पूर्ण करायचे आहे. देशांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी येता यावं म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.

नागपूर ते चंद्रपूर मेट्रो ब्रॉडगेज जिल्ह्यात सुरू होत आहे. तसेच चंद्रपूर, मूल व पोंभुर्णा येथील बस स्थानकाची रखडलेली कामे पूर्ण होतील. येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्ह्याला दीडशे नवीन बसेस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य राखीव बटालियन कोर्टीमक्ता येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या बटालियनमध्ये 1007 पदे भरावयाची आहे. महाराष्ट्रातून चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या तीन नक्षलग्रस्त जिल्ह्यातील तरुणांना या ठिकाणी संधी मिळणार आहे.

पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन, चंद्रपूरचे सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय व इतर बांधकामे वेगाने पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वीरनारी वेकम्मा भिमनपल्लीवार, अरुणा रामटेके, पार्वती डाहुले , छाया नवले व वीर पिता वसंतराव डाहुले, बाळकृष्ण नवले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबतच 20 नोव्हेंबर 2021 ते 30 जून 2022 या कालावधीत महाआभास अभियान 2.0 अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंचायत समिती,  ग्रामपंचायत व  क्लस्टर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल व उल्लेखनीय प्रशासनीय सेवेबद्दल चंद्रपूर पोलीस दलातील अधिकारी व पोलिसमालदार यांना पोलीस पदक मंजूर झाल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच चंद्रपूर राखीव पोलीस दलातील सन 2022 मधील गुणवंत पोलीस खेळाडूंचा सत्कार एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, माजी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

दिनचर्या न्युज