राजुरा शहरात पुन्हा एकदा गोळीबार, भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षांची पत्नी ठार
राजुरा शहरात पुन्हा एकदा गोळीबार, भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षांची पत्नी ठार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राजुरा शहरातील सोमनाथपूर वार्डात अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो नेते सचिन डोहे ह्यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला असुन अन्य एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली. हे प्रकरण नेमके कशामुळे घडले हे मात्र गुलदस्त्यात आहे.
घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा डोहे ह्यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली ह्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेच्या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आपले काका माजी नगरसेवक राजेंद्र डोहे ह्यांचेसह बाहेर गेले होते.
विशेष म्हणजे यापूर्वी राजुऱ्यात गोळीबार झाल्याची घटना झाली होती त्यातही एका इसमाचा जीव गेला होता. वारंवार होत असलेल्या घटनेमुळे राजुर या शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मृतक पूर्वश्या डोहे यांना दोन मुले आहेत.
पुढील तपास राजुरा पोलीस फरार असलेल्या अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत.