चंद्रपूर वीज केंद्राची ग्रीन पेटल-२०१८ पुरस्कारासाठी निवड

नागपूर/प्रतिनिधी:

महानिर्मितीच्या २९०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची जल संवर्धन व पर्यावरणीय पुढाकारासाठी ग्रीन पेटल-२०१८ या पुरस्कारासाठी ग्रीन मॅपल फाउंडेशनने निवड केली आहे.

 पर्यावरण संवर्धन विषयक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्याचे काम ग्रीन मॅपल फाउंडेशन करीत असते. २ डिसेम्बर २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही चंद्रपुरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हि प्राथमिकता ठेवली तर दुसरीकडे  वीज उत्पादन देखील सुरळीत सुरु ठेवले. अतिशय नियोजनबद्ध असे सर्वोत्तम “जल संवर्धन” केल्याने चंद्रपूर वीज केंद्राची “जल संवर्धन” विजेता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सोबतच चंद्रपूर वीज केंद्रात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरु असते, ज्यामध्ये  पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय परिसंवाद, कार्यशाळा, जनजागृती, वृक्षारोपण मोहीम तसेच विविध उपक्रमांचा समावेश असतो. या सर्व बाबी ध्यानात घेऊन ग्रीन मॅपल फाउंडेशनने चंद्रपूर  वीज केंद्राची ग्रीन पेटल-२०१८ या  “पर्यावरण व्यवस्थापन” साध्य करणाऱ्या पुरस्कारासाठी देखील निवड केली आहे. 

विशेष म्हणजे, यावर्षी, पर्यावरण संरक्षण व संवर्धन विषयक उल्लेखनीय कार्याबद्दल चंद्रपूर  महाऔष्णिक विद्युत केंद्राला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फोर स्टार रेटिंग प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.

वीज उत्पादन करताना हवेतील प्रदूषण कमी ठेवणे, धूलीकण वातावरणात पसरू नयेत याकरिता आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर करणे, पाण्याचा शून्य निसरा ठेवणे, राखेची उपयोगिता वाढविणे, वातावरणातील हवेच्या दर्जाचे मोजमाप करणे इत्यादीबाबींवर वीज केंद्र प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.