उजनी धरणावर 1000 मे.वॅ.तरंगत्या सौरप्रकल्पासाठी निविदा


नागपूर : नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेकरिता महावितरण कंपनीने अशा ऊर्जा र्स्त्रोतांपासुन तयार होणाऱ्या वीजेकरिता स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे वीज खरेदीबाबत विविध उपक्रम हाती घेतलेले आहे.

       या उपक्रमात पवन व सौर स्त्रोतांबरोबरच ऊसाची चिपाडे, कृषिजन्य टाकाऊ पदार्थासारख्या स्त्रोतांचा वीज निर्मितीत समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत महावितरणने निविदा काढलेल्या आहेत व या निविदा प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सौरऊर्जा प्रकल्प विकासकांसोबत वीज खरेदी करार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच भविष्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना अंतर्गत नविन निविदा काढण्याचे प्रयोजन केले आहे. सद्या ग्रीड संलग्न राज्याअंतर्गत आणि आंतरराजीय सौरऊर्जा प्रकल्पातून 1000 मे.वॅ.वीज खरेदीकरिता निविदा दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी प्रकाशित केली आहे.
जमिनीवरील उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांच्या वापरावर मर्यादा येत असल्यामुळे राज्यात मोठया प्रमाणात उपलब्ध असलेल्या तलाव/ धरणांच्या पाण्यावर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यास मोठया प्रमाणात वाव आहे. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने उजनी धरण, जि. सोलापूर येथे जलाशयावर 1000 मे.वॅ.क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्त केले आहे. त्या अनुषंगाने महावितरण कंपनीने सदर प्रकल्पासाठी स्वारस्याचे प्रकटीकरण मागविले होते. सदर स्वारस्य प्रकटीकरणद्वारे मिळालेल्या सूचनांचा विचार करण्यासाठी, तसेच तरंगत सौरऊर्जा प्रकल्पाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत या क्षेत्रातील मर्यादीत अनुभवाचा विचार करुन तरंगता सौरप्रकल्प आस्थपित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी/कामकाज/कार्यपध्दती/अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी शासनातर्फे संचालक(वाणिज्य), महावितरण, यांच्या अध्यक्षते खाली समिती गठीत करण्यात आली होती.
सदर समितीने दि.27 सप्टेंबर 2018 रोजी शासनास अहवाल सादर केलेला होता. तसेच दि.18 डिसेंबर 2018 रोजी मा.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने या प्रकल्पास दिलेल्या मान्यता व समितीच्या शिफारसीनुसार महावितरण कंपनी दि.24 डिसेंबर 2018 रोजी उजनी धरण, जि. सोलापूर येथील जलाशयावर 1000 मे.वॅ. (10X100 मे.वॅ. समुह) तरंगता सौरऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदीबाबत निविदा प्रकाशित केल्या आहेत. सदर स्पर्धात्मक निवड प्रक्रिया उलट बोलीसह करण्यात येणार आहे. सदर निविदेत तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासक किमान 100 मे.वॅ.क्षमता ते 1000 मे.वॅ. क्षमता स्थापित करु शकणार आहे आणि त्यासाठी समितीने उजनी धरण येथील जलाशयावर प्रत्येकी 100 मे.वॅ च्या 10 जागा निश्चित केल्या आहेत. जेथे प्रकल्प विकासक तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारणी करु शकतो. प्रकल्प विकासकाला तरंगते सौरऊर्जा प्रकल्पासोबत विजेचे निषकासन करण्याची प्रणाली उभारायची आहे.
हे तरंगते सौरप्रकल्प उभारल्यानंतर एका वर्षात कमीतकमी 1 टीएमसी पाण्याचे बाष्पीकरण टाळून, पाण्याची बचत करता येणार आहे. तसेच जमीनीवर उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या तुलणेत तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यक्षमता 6%  ते 7% नी जास्त अपेक्षित आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही उजनी धरण लगतच्या शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
सदर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता आवश्यक तपशीलवार माहिती टीसीआयएल वेब पोर्टल व महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.