काटवली येथील निसर्ग पर्यटन केंद्राचा शुभारंभ


चंद्रपूर दि.30 डिसेंबर : बल्लारपूर नजीकच्या बामणी काटवली गावातील कमलपुष्प निसर्ग पर्यटन केंद्राचे उद्घाटन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी उपस्थित पर्यटक व निसर्गप्रेमींना संबोधित करताना ते म्हणाले, बल्लारपूर मतदारसंघात एक नवीन निसर्ग पर्यटन केंद्र उभे होत आहे. याचा मला आनंद असून या निसर्ग पर्यटन केंद्राच्या मार्फत रोजगार निर्मिती व परिसराचा विकास अपेक्षित आहे. कोणताही नवा प्रकल्प सुरू होतो तेव्हा त्या मतदारसंघाला तो पुढे घेऊन जात असतो. या नव्या प्रकल्पातून देखील प्रगतीच्या नवीन वाटा सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये या पर्यटन केंद्रा प्रमाणेच नवनवीन प्रयोग करावेत व जे बाजारात विकल्या जाते ते पिकवण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आता या सूत्राचा वापर झाला पाहिजे. आपल्या परिसरातील पिकांवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांनी उन्नती साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणारे किरण चव्हाण, प्रशांत किंनकर आदींचा सत्कार करण्यात आला. निसर्ग केंद्र सुरु करणारे राजेंद्र गोलेच्छा, पंकज गोलेचा, मनोज सिंग यांच्यासह बामणी काटवली गावाचे सरपंच श्री.आत्राम तसेच नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार उपस्थित होते.