दृढसंकल्‍प हा प्रत्‍येक समस्‍येवर प्रभावी उपाय:सुधीर मुनगंटीवार

कोरपना येथील स्‍टेडियमच्‍या बांधकामासाठी निधी उपलब्‍ध करणार
चंद्रपूर/प्रतिनिधी:

प्रत्‍येक समस्‍येवर रामबाण उपाय म्‍हणजे दृढसंकल्‍प. दृढसंकल्‍पासाठी शिक्षण अतिशय महत्‍वाचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्‍हटले आहे. त्‍या महामानवाच्‍या प्रतिमेला वंदन करताना त्‍यांच्‍या आदर्शावर एक पाऊल पुढे जाण्‍याचा संकल्‍प करण्‍याची आज आवश्‍यकता आहे. युपीएससी, एमपीएससी तसेच अन्‍य स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये या जिल्‍हयातील विद्यार्थी यशस्‍वी ठरावे यासाठी आपण मिशन सेवा हाती घेतले आहे. स्‍टुडंट फोरम ग्रुप ने यासंदर्भात घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्‍याचे कौतुकोदगार अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आ. संजय धोटे यांनी केलेल्‍या मागणीनुसार कोरपना येथील स्‍टेडियमचे बांधकाम पूर्ण करण्‍यासाठी निधी उपलब्‍ध करण्‍याची घोषणा त्‍यांनी यावेळी केली.

दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील कोरपना येथे स्‍टुडंट फोरम ग्रुप द्वारा आयोजित महात्‍मा फुले शिष्‍यवृत्‍ती स्‍पर्धा परिक्षा कार्यक्रमाच्‍या उदघाटन सोहळयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, श्रीमती कांता भगत, श्रीमती विजयालक्ष्‍मी धोटे, दिलीप झाडे, वैभव ठाकरे, उपेंद्र मालेकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, आज समाजात स्‍वतःसाठी जगण्‍याची वृत्‍ती वाढत चालली आहे. इतरांसाठी जगणे, इतरांचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे. स्‍टुडंट फोरम ग्रुप च्‍या पदाधिका-यांनी जातीच्‍या बाहेर जावून विचार करण्‍याचा संकल्‍प बोलुन दाखविला तो अतिशय महत्‍वाचा आहे. जातीचा अभिमान हवा परंतु अहंकार नको असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले. कोरपना, जिवती या परिसराच्‍या विकासासाठी आपण मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून दिला असल्‍याचे सांगत अर्थमंत्री मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, जिवतीसाठी 7 कोटी रूपये निधी, कोरपना पंचायत समितीच्‍या फर्निचरसाठी 1 कोटी रू. निधी, कोरपना शहराच्‍या विकासासाठी 2 कोटी रू. निधी, राजु-यासाठी 4 कोटी रू., गडचांदूर येथे बसस्‍थानक यासह राष्‍ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुध्‍दा या परिसरात होवू घातले आहे. या परिसरात संजय धोटे यांच्‍या मागणीनुसार विमानतळाचे बांधकाम सुध्‍दा लवकरच सुरू होईल. कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग या परिसरात उभारण्‍याचा आमचा मानस आहे. कोरपना येथील विद्यार्थ्‍यांसाठी अभ्‍यासिकेची मागणी करण्‍यात आली आहे. आपण जागा उपलब्‍ध करून द्या आम्‍ही अभ्‍यासिका सुध्‍दा बांधून देवू व त्‍या माध्‍यमातुन स्‍पर्धा परिक्षांसाठी तयारीसाठी आवश्‍यक पुस्‍तके मोफत उपलब्‍ध करून देवू असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी बोलताना आ. संजय धोटे म्‍हणाले, राजुरा विधानसभा क्षेत्राच्‍या विकासासाठी ना. मुनगंटीवार यांनी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून दिला आहे. जेव्‍हाही विकासकामांसाठी आम्‍ही निधी मागीतला त्‍यांनी कधिही नकार दिला नाही. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात हा जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर होत आहे. त्‍यांच्‍या दमदार नेतृत्‍वात वित्‍त व वनविभागाची वाटचाल हे त्‍यांच्‍या अभ्‍यासू आणि कार्यक्षम नेतृत्‍वाचे द्योतक असल्‍याचे आ. धोटे यावेळी बोलताना म्‍हणाले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.