महावितरण संचालक (प्रकल्प) पदी भालचंद्र खंडाईत यांची निवड

नागपूर/प्रतिनिधी:

महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी दि. १५ जानेवारी २०१९ रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. 

भालचंद्र खंडाईत हे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतील सानगडी येथील रहिवासी असून त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात दि. २३ ऑगस्ट १९८९ रोजी चंद्रपूर परिमंडलातील नवरगाव वितरण केंद्रात कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्या कार्यकाळाला सुरुवात केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून ते दि. २३ एप्रिल २००७ रोजी काटोल विभागात रुजू झाले. दि. २२ फेब्रुवारी २००८ ते दि. ५ मे २०११ पर्यंत कार्यकारी अभियंता म्हणून काँग्रेसनगर विभाग येथे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कॉग्रेसनगर विभागाने राज्यातील पहिल्या तीन विभागात स्थान पटकाविले होते, यादरम्यान त्यांनी कॉग्रेसनगर विभागात पायाभुत सुविधा उभारण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले. 

दि. ९ मे २०११ रोजी त्यांची अधीक्षक अभियंता पदावर मुंबई मुख्यालयात बढती झाली. त्यानंतर गणेशखिंड शहर मंडल कार्यालय येथे ते अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. मुंबई मुख्यालयात प्रारंभी मुख्य अभियंता (वितरण) आणि त्यानंतर मुख्य अभियंता (वाणिज्य) या दोन्ही पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. दि. १६ मे २०१७ रोजी त्यांची प्रादेशिक संचालक म्हणून नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात निवड झाली. 

प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत असताना सौभाग्य योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ऐटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी तेथील गावकऱ्यांसोबत चर्चा करून ऊर्जीकरणाची कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच राज्यात एचव्हीडीएस योजनेचे काम सर्वप्रथम नागपूर विभागात त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाले.