आज विश्वास नांगरे पाटील चंद्रपुरात

प्रदीप लोखंडे व इतर मान्यवराचे मार्गदर्शन
 सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ
चंद्रपूर /प्रतिनिधी:

चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या मैदानात पूर्ण क्षमतेने उतरविण्यासाठी मिशन सेवा स्पर्धा महोत्सवाची सुरुवात आज होत आहे. तरुणांचे प्रेरणास्थान असणारे व आपल्या मार्गदर्शनाने अनेकांच्या आकांक्षांना यशाचे पंख देणारे विश्वास नांगरे पाटील व प्रदीप लोखंडे यांच्यासह प्रशासन व स्पर्धा परीक्षेतील मातब्बर वक्ते या एक दिवसीय महोत्सवात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मिशन शौर्यच्या यशानंतर राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन शक्ती हाती घेतले आहे. मिशन शक्ती अंतर्गत लवकरच जिल्ह्यातील क्रीडा जगतातील युवा खेळाडूंना ऑलम्पिक पदकासाठी तयार करण्यात येणार आहे. तर मिशन सेवा अंतर्गत युपीएससी-एमपीएससी व तत्सम सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणींचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्यातील मेगा भरती मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना सर्व पदांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळावे अशी भूमिका आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली आहे. राज्यातील कुठलीही स्पर्धा परीक्षा असो चंद्रपूरच्या मुलांची संख्या त्यामध्ये लक्षणीय असावी हा त्यांचा कटाक्ष असून त्यासाठीच त्यांनी मिशन सेवा मोहिमेला सुरुवात केली आहे.

मिशन सेवा सुरू करताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासिका निर्माण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक स्तरावर फक्त मुलींनाच अभ्यास करता याव्या अशाही काही अभ्यासिका निर्माण करण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. सध्या चंद्रपूर व मुल येथे अभ्यासिका मध्ये मुलांनी सराव करणे सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन आणि देखील या संदर्भात मोठी तयारी केली असून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ सनदी अधिकारी विद्यार्थ्यांना दर रविवारी आपला वेळ देत आहे.नुकतेच शासकीय सेवेत आलेले अधिकारी यामध्ये अधिक पुढाकार घेत असून परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जायचे प्रश्नांचे स्वरूप परीक्षांमध्ये परीक्षकांची अपेक्षा याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. याशिवाय ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे सराव पूर्व परीक्षा देखील दर रविवारी घेतली जात आहे. जिल्ह्यामध्ये सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे एक वातावरण तयार झाले असून याला गती देण्यासाठी 16 जानेवारी रोजी चांदा क्लब ग्राउंडवर राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विशाल सेवा संदर्भातील पुढील धोरण निश्चित करणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी मिशन सेवा मोहिमेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेण्यासाठी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. चांदा क्लब वरील भव्य मंडपामध्ये शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. जिल्हा प्रशासन यासाठी तयारीला लागले असून वरील प्रवेश मोफत राहणार असून परीक्षा इच्छुक सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ऐकता यावी अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे.

16 जानेवारीला ना. सुधीर मुनगंटीवार, विश्वास नागरे पाटील, प्रदीप लोखंडे यांच्यासह मुंबई सीजीएसटीचे जॉइंट कमिशनर राहुल गावंडे ,लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन इटनकर, अकोल्याचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, आदींचे मार्गदर्शन सुद्धा या स्पर्धा महोत्सवात विद्यार्थ्यांना लागणार आहे. मोफत प्रवेश असलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे