कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवरला अटक

नागपूर :अग्निशस्त्र तस्करी प्रकरणी फरार चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवर खान रा.नकोडा याला दहशतवाद विरोधी पथकाद्वारे अटक करण्यात आली आहे.त्याचे ताब्यातून एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 
नक्षल्यांना अग्नीशस्त्रा पुरवठा करण्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने २४ जानेवारी रोजी रात्री नागपूर येथील रेल्वे स्टेशन येथे संजय संदीपन खरे वय ४३ वर्ष रा.अशोकनगर वडगाव ता. वणी व सुपतसिंग वय ४१ वर्ष रा.लक्ष्मीपूर बिहार या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल व २० जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. सदर अग्निशस्त्राचा पुरवठा हाजीबाबास करण्यात येत होता. असे निष्पन्न झाल्यानंतर एटीएस ने हाजीवर नजर रोखली होती. परंतु तो फरार झाला होता.एटीएसने सात दिवसानंतर गिरड येथे त्याच्या मुसक्या आवळून आज (सोमवार) नागपूरला आणले आहे.
हाजीबाबा याचा कोळसा तस्करीचा व्यवसाय असून ,त्याची घुग्गुस भागात प्रचंड दहशत आहे.त्याने यापूर्वी नकोडी येथील उपसरपंच म्हणून पदभार सांभाळला आहे.त्याचे विरुद्ध चंद्रपूरजिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.नागपूर येथील कुख्यात गुंड शेखू खान त्याचा प्रतिस्पर्धी असून त्याने पांच ते सहा वर्षापूर्वी घुग्गुस येथे जाऊन हाजीवर तुफान गोळीबार केला होता. हाजी यात थोडक्यात बचावला.हाजीला यापूर्वी नागपूर येथे लाहोरी बिअर बार येथील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली होती.हाजी आणि शेखू एकाच वेळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असताना आपसी दुष्मनीतून मोठी समस्या निर्माण झाली होती.हाजीचे काही नक्षल कनेक्शन आहे काय? याचा एटीएस व्दारे शोध घेण्यात येत आहे.