कामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण

नागपूर/प्रतीनिधी:
कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरणसह अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून याचा लाभ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. असे उद्गार राज्याचे ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे काढले. 
  ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उप केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या
 १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण करताना ना. बावनकुळे
महावितरणच्या वतीने कामठी शहरात उभारण्यात आलेल्या नवीन वीज वाहिनीचे लोकार्पण आणि भाजी मंडी-कोळसा टाल या नवीन वाहिनीच्या कामाचे तसेच ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उप केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण ना. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. ड्रॅगन पॅलेस वीज उपकेंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे तर कामठी नगर परिषद अध्यक्ष मो. शहाजहाँ शफाअत अन्सारी, उपाध्यक्ष मतीन खान, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, कामठी तालुका विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल विशेष उपस्थित होते. 

ड्रॅगन पॅलेस मुळे कामठी शहराची जगात ओळख निर्माण झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथील वीज वितरणाचे जाळे मजबूत होत आहे. सोबतच पथ दिवे आणि पाणी पुरवठ्यासाठी साधारण २ मेगा वॅट विजेची गरज भासणार आहे यासाठी नगर पालिकेने जागा दिल्यास हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करता येईल यासाठी शासनाकडून १२ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी यावेळी दाखवली. 

कामठी परिसरात भूमिगत वीज वाहिनीची कामे करतेवेळी वॉर्ड पातळीवर कामाचे नियोजन करून ती पूर्ण करण्याची सूचना ना. बावनकुळे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गास केली. कामठी ड्रॅगन पॅलेस येथील वीज उपकेंद्रात २० एमव्हीए क्षमतेचे २ रोहित्र उभारण्यात आल्याने परिसरास दर्जेदार वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. अशी माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. यावेळी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा)उमेश शहारे, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपें उपस्थित होते.