नागभीड तालुक्यात बिबट्याचा हल्ले सुरुच , नागरिक भयभीत




नागभीड तालुक्यात बिबट्याचा हल्ले सुरुच , नागरिक भयभीत


*बिबट्याला जेरबंद करण्याची संजय गजपुरे यांची मागणी

दिनचर्या न्युज
नागभीड तालुक्यातील आकापुर गावालगत बिबट्याने भाकरे परीवारातील २ बकऱ्या व एका कुत्र्याला आज शनिवारी सायंकाळचे सुमारास मारले आहे. सदर बिबट्या अजुनही झुडपातच असुन बिबट्याला पकडण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी तातडीने आकापुर येथील घटनास्थळी भेट देत वनकर्मचारी व अधिकाऱ्यांना कॅमेरे व पिंजरा लावण्याची सुचना केली व गावकऱ्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याची विनंती केली.मृत बकऱ्यांचे पंचनामे करुन तातडीने बकरी मालकांना वनविभागाने आर्थिक मदत करावी अशी मागणी संजय गजपुरे यांनी केली आहे.
      मागील आठवड्यात लगतच्या गंगासागर हेटी येथील घरात शिरुन ८ बकऱ्या मारल्याची घटना ताजी असतांना आता आकापुर येथील नागरिकही यामुळे भयभीत  झाले आहेत . जवळच्याच देवपायली येथे सुध्दा बिबट्याने गोठ्यात घुसुन एका युवकाला मागील आठवड्यात जखमी केले होते. वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असतांनाच ही घटना घडल्याने पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात भरदिवसा घडणाऱ्या या प्रकाराने परिसरातील शेतकरीही धास्तावले आहेत . 
      आजच पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याने सुभाष बुधाजी आत्राम , आकापुर यांच्या घरात घुसून हल्ला चढविला पण घरमालकाच्या ओरडणं ऐकून बकऱ्याला जखमी करून वर कवेलू काढून पसार झाला ..
    आता रात्री ८ च्या सुमारास बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्यात आला आहे . वनविभागाची टीम घटनास्थळी हजर असुन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत

दिनचर्या न्युज