पोंभुर्णा येथील म. ज्‍योतीराव फुले सामाजिक सभागृहाचे बांधकाम साडेचार महिन्‍यात पूर्ण होणार – आ. सुधीर मुनगंटीवार




पोंभुर्णा येथील म. ज्‍योतीराव फुले सामाजिक सभागृहाचे बांधकाम साडेचार महिन्‍यात पूर्ण होणार – आ. सुधीर मुनगंटीवार

*हे सभागृह म. ज्‍योतीराव फुले आणि सावित्रीबार्इ फुले यांनी घालुन दिलेल्‍या आ‍दर्शांना पुढे नेण्‍याचे व्‍यासपीठ ठरावे*

*पोंभुर्णा येथे पत्रकार भवनाचे लोकार्पण व म. ज्‍योतीराव फुले सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन संपन्‍न*

दिनचर्या न्युज :-

पोंभुर्णा येथील महात्‍मा ज्‍योतीराव फुले सामाजिक सभागृहासाठी आम्‍ही वैशिष्‍टपूर्ण निधीच्‍या माध्‍यमातुन तरतूद केली होती. मात्र सरकार बदलले आणि या निधीला स्‍थगिती आली. या सभागृहाबाबत आम्‍ही माळी समाज बांधवांना शब्‍द दिला होता. त्‍यामुळे हा शब्‍द कसा पूर्ण होणार हा स्‍वाभाविक प्रश्‍न स्‍थानिक पदाधिका-यांना पडला. मात्र आजवर विकासासंबंधी जो शब्‍द आम्‍ही नागरिकांना दिला तो पूर्ण करायचाच असा आमचा निर्धार असल्‍यामुळे या सभागृहासाठी खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन 80 लक्ष रू. निधी मंजूर करविला आणि आज या सभागृहाचे भूमीपूजन ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या हस्‍ते संपन्‍न होत आहे याचा मला विशेष अभिमान व आनंद असल्‍याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. हे सभागृह येत्‍या चार ते साडेचार महिन्‍यांच्‍या कालावधीत लोकार्पणासाठी सज्‍ज असेल असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला.
दिनांक 31 ऑक्‍टोबर रोजी पोंभुर्णा येथे पत्रकार भवन तसेच मुख्‍याधिकारी निवासस्‍थानाचे लोकार्पण त्‍याचप्रमाणे खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन मंजूर महात्‍मा ज्‍योतीराव फुले सामाजिक सभागृहाचा भूमीपूजन सोहळा संपन्‍न झाला. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या अध्‍यक्षा सौ. श्‍वेता वनकर, उपाध्‍यक्षा रजिया कुरैशी, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, उपसभापती ज्‍योती बुरांडे, माळी समाजाच्‍या अध्‍यक्षा कल्‍पना गुरनुले, चरण गुरनुले, रवी वाढई, ऋषी कोटरंगे, सदगुरू भोले, अरूण गुरनुले, अजित मंगळगिरीवार, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी श्री. मेश्राम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत भास्‍करवार, उपविभागीय अभियंता श्री. टांगले यांच्‍यासह नगरसेवकांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, ज्‍या पत्रकार भवनाचे आज लोकार्पण झाले. त्‍या पत्रकार भवनाच्‍या मागणीसाठी भाजपाचे स्‍थानिक पदाधिकारी मला भेटले. त्‍यावेळी माजी मुख्‍यमंत्री खा. नारायण राणे नुकतेच राज्‍यसभा सदस्‍य झाले होते. मी त्‍यांना विनंती केली व त्‍यांनी तात्‍काळ या भवनासाठी 25 लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला. यासाठी मी त्‍यांचा मनापासून आभारी आहे. 1999 मध्‍ये पोंभुर्णा तालुक्‍याची निर्मीती झाली. मात्र याठिकाणी अधिकारी येण्‍यास तयार नव्‍हते. मी या विभागाचा आमदार झाल्‍यानंतर पोंभुर्णा तालुक्‍याला विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न केले. पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या निर्मीतीला अद्याप 5 वर्षे पूर्ण झाली नाहीत मात्र या नगर पंचायत क्षेत्रात जी विकासकामे झाली ती राज्‍यात कोणत्‍याही नगर पंचायत क्षेत्रात झालेली नाही. राज्‍यातील कोणत्‍याही नगर परिषदेला किंवा पंचायतीला हेवा वाटावा अशी नगर पंचायतीची आकर्षक इमारत, पंचायत समितीची इमारत, तहसिल कार्यालयाची इमारत, वनविभागाचे विश्रामगृह, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, अगरबत्‍ती उत्‍पादन प्रकल्‍प, टूथपिक उत्‍पादन प्रकल्‍प, सिमेंट रस्‍त्‍यांची बांधकामे असा बहुमुखी विकास या शहराने अनुभवला. श्री राजराजेश्‍वर मंदीर परिसराच्‍या सौंदर्यीकरणाचे व जिर्णोध्‍दाराचे कामही पूर्णतवास येत आहे. छोटयातली छोटी मागणी पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न या भागाचा लोकप्रतिनिधी म्‍हणून मी केला आहे. स्‍वर्गरथाची मागणी असो वा कोल्‍ड स्‍टोरेजची व्‍यवस्‍था असलेली शवपेटी असो अशा अनेक मागण्‍या आम्‍ही पूर्णत्‍वास आणल्‍या. म. ज्‍योतीराव फुले सभागृहाच्‍या बांधकामासाठी 11 महिन्‍यांचा कालावधी जरी दिला असला तरीही येत्‍या साडेचार महिन्‍यात हे बांधकाम पूर्ण करण्‍यात येईल असे बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांनी सांगीतल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले. हे सभागृह केवळ एक वास्‍तु नसून क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीराव फुले आणि क्रांतीज्‍योती सावित्रीबार्इ फुले यांनी घालुन दिलेल्‍या आ‍दर्शांना पुढे नेण्‍याचे व्‍यासपीठ ठरावे अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केली.
पोंभुर्णा तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात सुध्‍दा सिंचनाच्‍या सोई उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने आम्‍ही प्रयत्‍न केले असे सांगताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, या परिसरातील शेतक-यांना वैयक्‍तीक सिंचन विहीरींचा लाभ आम्‍ही मिळवून दिला. पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजना, दिघोरी येथे बंदनलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन सुविधा, चिचाळा येथे बंदनलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन सुविधा उपलब्‍ध करण्‍याचे प्रकल्‍प, गेटेड बंधारे, शेततळे आदींच्‍या माध्‍यमातुन सिंचन सुविधा आम्‍ही उपलब्‍ध केल्‍यात. माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण करण्‍यासाठी निधी उपलब्‍ध केला. टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने 90 गावांमध्‍ये शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रकल्‍प आम्‍ही राबविला. संजय गांधी निराधार योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजनेच्‍या लाभार्थ्‍यांच्‍या अनुदानात 600 रू. वरून 1000 रू. इतकी तर दोन अपत्‍ये असणा-यांना 1200 रू. इतकी वाढ आम्‍ही केली. या पुढील काळातही या भागातील नागरिकांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍या, शेतक-यांच्‍या चेह-यावर आनंद निर्माण व्‍हावा यासाठी आपण प्रयत्‍नशील राहू, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांचेही भाषण झाले. माळी समाज बांधवांच्‍या मागण्‍यांसाठी आ. मुनगंटीवार यांनी जेव्‍हा जेव्‍हा शब्‍द दिला तो परिश्रमपूर्वक पूर्ण केला. क्रांतीसुर्य म. ज्‍योतीराव फुले व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या वंशजांच्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी त्‍यांनी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन यशस्‍वी संघर्ष केला. पुणे विद्यापीठाला क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांचे नांव मिळण्‍यासाठी त्‍यांनी यशस्‍वी संघर्ष केला. म. ज्‍योतीराव फुले यांच्‍या पुण्‍यातील वाडयाच्‍या दुरूस्‍तीसाठी त्‍यांनी निधी मंजूर करविला. मुल तालुक्‍यातील कांतापेठ येथे सभागृहाचे बांधकाम, विसापूर येथे ज्‍योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्‍या पुतळयांची उभारणी त्‍यांनी केली. माळी समाज बांधवांच्‍या पोटजातींचा प्रश्‍न त्‍यांनी निकाली काढला. आजवर आम्‍ही समाजबांधवांनी ज्‍या ज्‍या मागण्‍या केल्‍या त्‍या पूर्ण करण्‍यासाठी आ. मुनगंटीवार यांनी जे यशस्‍वी प्रयत्‍न केले ते माळी समाजबांधव कधिही विसरू शकणार नाही. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र बघेल यांनी केले. कार्यक्रमाला पोंभुर्णा येथील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. सोशल डिस्‍टंन्‍सींगचे पालन करत कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या संपन्‍न झाला.