स्वातंत्र्याच्या समरात ऑगस्ट क्रांती मैदानाचं महत्व अनन्य साधारण - मा. ना. सुधीर मुनगंटीवार





स्वातंत्र्याच्या समरात ऑगस्ट क्रांती मैदानाचं महत्व अनन्य साधारण - मा. ना. सुधीर मुनगंटीवार

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी क्रांती दिनी केले शहिदांना अभिवादन*

दिनचर्या न्युज :-
मुंबई : स्वातंत्र्याच्या इतिहासात मुंबईच्या क्रांती मैदानाचं अनन्य साधारण महत्व आहे ; देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना त्रिवार अभिवादन करून स्वतंत्र भारताचे वैभव टिकवून ठेवण्याची, राष्ट्रभक्तीची प्रेरणा या क्रांती स्थळावरून मिळते असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानावर क्रांती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली, त्यावेळी ते बोलत होते.

ना मुनगंटीवार म्हणाले , स्वातंत्र्य समरात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी इंग्रजांना 'चले जाव' चा इशारा देत स्वातंत्र्याचा हुंकार दिला , तो उठाव अभूतपूर्व होता. त्या दिवसाची आठवण आपल्याला नेहमी राहायला हवी. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला या स्थळावरून सदैव प्रेरणा मिळत राहील असे भावपूर्ण उद्गार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भारत मातेच्या थोर सुपुत्राना आदरांजली वाहून नव्या जबाबदारीची सुरुवात करत असल्याने एक सकारात्मक ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन, ब्रिटिश गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण कायम रहावी तसेच नव्या पिढीला या हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी क्रांती दिन महत्वाचा आहे असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी मुंबई भाजपा सचिव अमोल जाधव , भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनीलसिंह , बल्लारपूर येथील माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम रायकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

दिनचर्या न्युज