मुंबईत आदिवासी विकास केंद्र तत्काळ स्थापन करणार – खा. शरद पवार यांची घोषणा



मुंबईत आदिवासी विकास केंद्र तत्काळ स्थापन करणार – खा. शरद पवार यांची घोषणा


सामूहिक वनहक्क धारक वनवासी व इतर पारंपरिक निवासी गावांची राज्यस्तरीय परिषद संपन्न

दिनचर्या न्युज :- १२/२/२०२३
*सेवाग्राम (वर्धा) / नागपूर :* यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आदिवासी विकास केंद्र तत्काळ सुरु करू, अशी घोषणा जेष्ठ नेते मा. खा. शरद पवार यांनी गांधी आश्रम, सेवाग्राम येथे केली. ते रविवार, १२ फेब्रुवारी रोजी सामुहिक वनहक्क धारक आदिवासी व इतर पारंपारीक वननिवासी गावांच्या राज्यस्तरीय परिषदेला संबोधित करत होते. यावेळी मंचावर सामुहिक वनहक्क व उपजीविका या विषयासंदर्भात राज्य व देश पातळीवर कार्यरत असलेले जेष्ठ व अनुभवी श्री दिलीप गोडे, श्रीमती प्रतिभा शिंदे, ॲड. पूर्णिमा उपाध्याय, डॉ. किशोर मोघे, श्री. मोतीराम सयाम, श्री. अमित कळस्कर तसेच आ. अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ग्रामसभा सदस्यांनी विविध ग्रामगीते, स्फुर्तिगीते, भजने म्हंटली. त्यानंतर नियोजित वेळी महिला ग्रामसभा सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सामूहिक वनहक्क व उपजीविका या विषयासंदर्भातील ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून जेष्ठ व आदरणीय नेते मा. खा. श्री शरद पवार यांनी आपल्या भाषणात सामुहिक वन हक्क आणि उपजीविका ग्रामसभा परिषदेसाठी गांधी आश्रम, सेवाग्रमची निवड केल्याबद्दल विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था, विदर्भ व खान्देश उपजीविका मंच आदी संघटनांची प्रशंसा केली. शरद पवार म्हणाले की, जल, जंगल जमीन यांचे संवर्धन करणारा एकमेव घटक म्हणजे आदिवासी होय. राज्यातील विविध ग्रामसभांची शक्ती वाढली पाहिजे. तसेच आदिवासींचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी विदर्भ व राज्यातील संस्था व संघटना यांनी ग्रामसभेच्या प्रतिनिधी, भगिनी व कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला व खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण गावांची संकल्पना व नैसर्गिक साधनसंपत्तीवरती स्थानिकांचा अधिकार ही संकल्पना या संस्थांनी राबविली या शब्दांत विदर्भ आणि राज्यातील ग्रामस्थ या शब्दांत त्यांनी परिषदेच्या आयोजकांची स्तुती केली. पवार साहेब यांनी आपल्या भाषणात महात्मा फुलेंचे उदाहरण शेती व जंगल यासंदर्भातील उदाहरण देत त्यांनी सांगितलेली निती व शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे स्वप्न आजही कसे संयुक्तिक आहे असे उदाहरणांसह सांगितले. ग्रामसभा ४० कोटींचा तेंदू, १५ कोटींचा महू, हिरडा, बेहडा यांसारखे काम विदर्भ ग्रामसभा महासंघ, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था यांसारख्या स्वयंसेवी संघटनांप्रमाणे सामुहिक वनहक्क आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेसंदर्भातील कार्य राज्यस्तरावर उभे राहिले पाहिजे. तसेच या संघटनांचा एक संघ राज्यस्तरावर निर्माण झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

या परिषदेत विदर्भ, खानदेश या विभागातील ग्रामसभा प्रतिनिधी व त्यांचेसोबत कार्यरत खोज, व्हीएनसीएस, जीएसएमटी, लोकसमन्वय प्रतिष्ठान, साकव, ग्राम आरोग्य, रिवॉर्ड, वननिकेतन, इश्यु, संदेश या संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. तसेच गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबर, धुळे या जिल्ह्यातील सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे ७०० पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी डॉ. दिलीप गोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर सामुहिक वनहक्क,राज्यातील स्थिती, वन,जल व कृषी आधारित आदिवासी उपजिविका व आव्हाने यावर अॅड. पुर्णिमा उपाध्याय यांनी पॉवर पॉईंट सादरीकरण केले. त्यात त्यांनी सामुहिक वनहक्क व उपजीविका विषयासंदर्भात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात झालेले काम आणि वर्तमान आव्हाने यांबद्दल माहिती दिली.

त्यानंतर मोतीलाल सयाम ( देवरी, गोंदिया), रामलाल काळे (अमरावती), पूजा भंगाळे (जळगाव-खान्देश-नंदुरबार) या ग्रामसभा सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रतिभाताई शिंदे यांनी देखील ग्रामस्थांच्या सामुहिक वनहक्क व उपजीविका यासंदर्भात संबोधन केले. परिषदेच्या समारोपाला डॉ. किशोर मोघे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

त्यानंतर ग्रामसभा सदस्यांच्या खुल्या चर्चासत्रात ग्रामसभा सदस्यांनी ग्रामसभांचे वन व जलसंधारण, उपजिविका, वनउपज व शेती यात झालेली विकास कामे, शासकीय योजनांचे अभिसरण, सामुहिक वनहक्क व उपजिविका, ग्रामसभांचे महासंघ व शासनासोबत सुसंवाद, यावर कार्य करतांना आलेल्या अडचणी व त्याकरीता करावयाची उपाययोजना यावर चर्चा करून निर्णय घेतले.