निविदा समिती अभ्यास गटात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश

निविदा समिती अभ्यास गटात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेशदिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 1: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्हणून 22 व 23 जून रोजी यशदा, पुणे येथे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये निवडणूक निविदा समिती अभ्यास गट स्थापन करण्यात आला असून या गटात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचा समावेश करण्यात आला आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या 30 ऑगस्ट 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापित करण्यात आलेल्या निवडणूक निविदा समितीने वस्तूंच्या खरेदी करण्यासाठी व सुसूत्रता आणण्यासाठी तसेच सर्वकश निविदा कागदपत्र आणि अटी शर्ती निश्चित करण्यासंदर्भातील समितीचा अहवाल सादर केला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेचे अनुषंगाने सदर समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. यात या अभ्यास गटामध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनायक गौडा यांचा समावेश आहे.

सदर अभ्यास गटामध्ये खालील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचा समावेश आहे. राजेंद्र भोसले (मुंबई), डॉ. राजेश देशमुख (पुणे), राहुल कर्डिले (वर्धा), सचिन ओंबासे (उस्मानाबाद), राहुल रेखावार (कोल्हापूर), विपिन इटनकर (नागपूर) आणि विनय गौडा (चंद्रपूर).
वरील अभ्यास गटाने सांगोपांग अभ्यास करून खालील बाबीवर सूचना/ शिफारसी करावयाच्या आहेत.
निविदा समितीच्या अहवालामधील अटी शर्ती, नियम, वित्तीय बाबी, दरांच्या सरासरी संदर्भातील मूल्यांकन पद्धती, पुरवठादाराने प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून देताना प्रमाण पद्धती कशी असावी, त्या अनुषंगाने नोंदवही ठेवण्याबाबत सूचना कराव्यात. सदर नोंदवही ठेवताना पुरवठाधारक तसेच जिल्हाधिकारी यांच्यातर्फे नियुक्ती करण्यात आलेल्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरी असणे याबाबत सूचना कराव्यात, असे राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.रा.पारकर यांनी कळविले आहे.

दिनचर्या न्युज