विदर्भ राज्य निर्माण यात्रा २ जानेवारीपासून

२०१९ च्या निवडणूकी अगोदर विदर्भ राज्य निर्माण करावेच लागेलविदर्भ राज्य आंदोलन समिती येत्या निवडणूका लढविणार - विदर्भ राज्य आंदोलन समिती


नागपूर /प्रतिनिधी
भाजपाने मागील निवडणूकीत स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देऊन विदर्भाच्या नावानेच निवडणूका घेतल्या . त्यानुसार विदर्भातील जनतेने भाजपाचे सरकार राज्यामध्ये बसविले . भाजपाला विदर्भातील जनतेने प्रामाणिकपणे साथ दिली परंतू भाजपाचे नेते विदर्भातील जनतेला दिलेले आश्वासन विसरले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा म्हणतात विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही असे म्हणून भाजपाच्या नेत्यांनी विदर्भातील जनतेचा मोठा अपमान केला आहे. त्यामुळे विदर्भातील जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विदर्भवाद्यांनी दिला.
येत्या डिसेंबर मध्ये लोकसभेचे सत्र होणार आहे तसेच फरवरी मध्ये सुद्धा एक सत्र होईल . भाजपा सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही . येणा - या लोकसभेच्या सत्रामध्ये विदर्भ राज्य निर्माण करण्याची घोषणा करून लोकसभेत ठराव करावा व वैदर्भीय जनतेला दिलेले विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन पूर्ण करावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून करण्यात येते . ' दि . २ जानेवारी ते १२ जानेवारी २०१९ पर्यंत विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येणार आहे . भाजपा सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची घोषणा करावी यासाठी  ही लोकजागर यात्रा राहणार असून पूर्व व पश्चिम विदर्भात २ यात्रा निघणार आहे . दि . २ जानेवारीला नागपूर गांधीपुतळा , सिताबर्डी येथून या दोन्ही यात्रा निघतील . एक यात्रा संपूर्ण पूर्व विदर्भ फिरून दुसरी यात्रा संपूर्ण पश्चिम विदर्भ फिरून दोन्ही यात्रा नागपूरला १२ जानेवारी परत येऊन नागपूरला या यात्रेचा समारोप होईल . या ११ दिवसीय यात्रेमध्ये १०० लहान मोठ्या सभा होतील . " २०१९ च्या अगोदर विदर्भ द्या , अन्यथा विदर्भातून चालते व्हा ' असे भाजपाला सांगण्यात येईल यासाठी ही जनजागृती यात्रा होणार आहे . २०१९ मध्ये होणा - या लोकसभा - विधान सभेच्या निवडणूका विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक आंदोलन ' म्हणून लढणार आहे. त्यासाठी सर्व विदर्भवादी पक्ष , विदर्भवादी संघटना , विदर्भवादी नेते - कार्यकर्ते तसेच विदर्भातील शेतकरी संघटना यांचेशी समन्वय करून ह्या निवडणूका लढण्यात येईल असेही ठरले आहे .
पत्रकार परिषदेला अॅड . वामनराव चटप, राम नेवले , डॉ . श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती, अरूण केदार, अरविंद देशमुख, रंजना मामर्ड, विजया धोटे, राजकुमार नागुलवार, अॅड . सुरेश वानखेडे, देविदास लांजेवार, जगदिश नाना बोंडे, राजेंद्र आगरकर, कृष्णा भोंगाडे उपस्थित होते.