माजी आमदार कृष्णराव पांडव यांचे निधन

नागपूर : येथील माजी महापौर आणि माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. 22) निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. 
1970 साली त्यांनी नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर, 1971 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम बघीतले. बारा वर्ष त्यांनी विधानपरिषदेत आमदार म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

नगरसेवक ते आमदार या राजकीय प्रवासात त्यांनी प्रदेश कॉग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविली. सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. गरीब होतकरु आणि मागासवर्गातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देण्यासाठी या संस्थेमार्फत जवळपास 45 शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना करुन भरीव कार्य केले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वंसतराव साठे, निर्मलाबाई देशपांडे यांचेसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या मागे गिरीश आणि किरण अशी दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी (ता. 23) बारा वाजता धंतोली येथील निवासस्थानातून निघून दिघोरी येथील राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.