पालकमंत्र्यांकडून मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी

अद्ययावत हॉस्पिटल जनतेच्या सेवेत लवकरात लवकर

रुजू करण्यासाठी प्रयत्न करा : विजय वडेट्टीवार

पालकमंत्र्यांकडून मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी
चंद्रपूर, 

 : चंद्रपूर महानगराच्या बाय पास परिसरात उभ्या राहात असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार सध्या चार दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल राजुरा व गडचांदूर येथील कार्यक्रमानंतर रात्री त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आज त्यांनी सकाळी बायपास रोड परिसरात शंभर एकरावर आकारास येत असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केली.

आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांनी या दोन्हीही निर्माणाधीन वास्तूला भेट दिली. या वास्तूचे कामकाज नियोजित वेळेनुसार व्हावेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिशय भूषणावह असे हे हॉस्पिटल व्हावेत यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी निर्माणाधीन वास्तूच्या वैशिष्ट्यांची माहिती घेतली. बायपास रोडवर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत शंभर एकर जागेत उभी राहत आहे. सुमारे 600 कोटीहून अधिक निधी यासाठी मंजूर झाला असून 640  बेडचे रूग्णालय सुद्धा याठिकाणी उभे राहणार आहे. तर याच परिसरात राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग, जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून खाजगी भागीदारी तत्त्वावर शंभर खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या निर्माण संदर्भात काम करणाऱ्या विविध एजन्सीच्या अधिकारी व समन्वयकांसोबत चर्चा केली. या भागातील जनतेला उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी लवकरात लवकर या भव्य वास्तू मधून आरोग्यसुविधा सुरू व्हाव्यात. यासाठी सगळ्यांनी जागरूकपणे काम करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

     वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.