सीसीआयच्या भावाने कापूस खरेदी करा... भाव पाडल्यास गंभीर कारवाई : पालकमंत्रीसीसीआयच्या भावाने कापूस खरेदी करा...
भाव पाडल्यास गंभीर कारवाई : पालकमंत्री

जिल्ह्यातील जिनिंग मालकाना क्षमतेप्रमाणे गाड्या मोजण्याचे निर्देश

चंद्रपूर दि १३ मे : चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा भाव पाडून कापूस घेतला जाणार नाही. अशा पद्धतीने कोणी फसवणूक केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, कापूस कार्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयने जाहीर केलेल्या भावाप्रमाणे कापसाची खरेदी करण्यात यावी, तसेच क्षमते प्रमाणे कापूस गाड्या मोजण्यास घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.
जिल्ह्यातील वरोरा, राजुरा या कापूस उत्पादक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी होत आहे. मात्र भाव पाडून कापूस उत्पादकांचा हिरमोड केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहे. यासंदर्भात आज आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिनिंग मालकांची बैठक लावण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रमुख जिनिंगचे मालक उपस्थित होते. यावेळी जिनिंग मालक तसेच सीसीआय व कापुस फेडरेशनच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर जिल्ह्यामध्ये कुठेही यापुढे भाव पाडून खरेदी केली जाणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
यासंदर्भात पुढे आलेल्या अडचणी नुसार पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सीसीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेलंगाना व आंध्र मध्ये कार्यरत असणाऱ्या चार ग्रेडरची उपलब्धता करून दिली. हे चार ग्रेडर येत्या दोन ते तीन दिवसात कापसाच्या दर्जात्मक मोजणीसाठी कार्यरत होणार आहे.
यावेळी जिनिंग मालकांनी आमच्या क्षमतेनुसार कापूस खरेदी करता यावी, अशी मागणी केली .तर फेडरेशनने किमान ६० ते ७० गाड्या दररोज मोजण्यात याव्यात अशी मागणी केली. जवळपास पंधरा हजार शेतकऱ्यांचा अध्याप कापूस मोजणे बाकी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बैठकीला राजुरा परिसराचे प्रतिनिधित्व करणारे आमदार सुभाष धोटे यांनी देखील जिनिंग मालकामार्फत राजुरा व लगतच्या परिसरात सुरू असलेल्या तक्रारीची मांडणी केली.
यासंदर्भात आणखी एक बैठकीची फेरी होणार आहे .तथापि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून भाव पाडून खरेदी करू नका असे स्पष्ट निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार सुभाष धोटे आमदार किशोर जोरगेवार यांनी गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी व त्यानंतर जिनिंगला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर जाणवलेल्या कमतरते बाबतही उहापोह केला. जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी यावेळी भाव पाहून खरेदी करण्याच्या तक्रारी नको. शेतकऱ्यांच्या संदर्भात यापुढे तक्रारी आल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले तसेच जिनिंगच्या संदर्भातील तक्रारी सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.