सरकारने शेतीसह घरगुती वीज बिल माफ करावीत.. शंभुसेना, माजी सैनिक आघाडीची जोरदार मागणी!



सरकारने शेतीसह घरगुती वीज बिल माफ करावीत.. शंभुसेना, माजी सैनिक आघाडीची जोरदार मागणी! 

दिनचर्या :-

मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेत्यांची शिष्टमंडळ भेट घेणार- शंभुसेना प्रमुख

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने राज्यातील किमान मागील ३ महिने व पुढील ३ महिन्यांचे असे एकूण सहा महिन्यांची घरगुती व शेतीची वीज बिले पूर्णपणे माफ करावीत अशी मागणी शंभुसेना प्रमुख व माजी सैनिक मा.श्री. दिपकजी राजेशिर्के यांच्यासह माजी सैनिक आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिले माफीसाठी लवकरच मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते व संबंधित वीज विभागाची भेट घेणार असल्याची माहिती शंभुसेना माजी सैनिक आघाडीच्या शिष्टमंडळाने दिली.

सध्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊनच्या संचार बंदीने सर्व देश आर्थिक संकटात सापडला असतानाच सामान्य जनताही पूर्णपणे बेरोजगार झाली असून प्रत्येकजण वेगवेगळ्या अडचणीला तोंड देत, समस्यांना सामोरे जात आहे, कोणाच्याही हाताला कामधंदा नसून शेतीच्या मालालाही योग्य भाव मिळत नसल्याने सध्या तरी फक्त घरात बसून राहण्याशिवाय व विनाकाम बसून खाण्या- पिण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे आता तर लोकांच्या जवळील थोडाफार जमवलेला पैसाही संपला आहे.

त्यात "दुष्काळात तेरावा महिना" या म्हणीप्रमाणे कडक उन्हाळा असल्याने चोवीस तास.. पंखे, एसी, फ्रिज, टीव्ही, मोबाईल चालू आहेत त्या कारणांनी वीज बिलेही भरमसाठ आली आहेत...येत आहेत..अन पुढे ही येणार आहेत..यात शंका नाही. शेतकऱ्यांच्या शेतीचीही तीच बोंब आहे पिकांना पाणी देण्यासाठी भरपूर प्रमाणात वीज लागत आहे, मशागती, बियाणे, खताला पैसा- पाणी गुंतला आहे, पण त्या पटीत मात्र बाजार-पेठा बंद असल्याने पिकाला मोबदला,भाव मिळत नाही, म्हणून सध्या शेती तोट्याची झाली आहे, सामान्य लोकांसह कष्टकरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर मात्र विजेच्या बिलाचा मोठा डोंगर येणार असल्याने सामान्य जनता खूपच धास्तावली आहे.

सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या योग्य मागणीसाठी शंभुसेना, माजी सैनिक आघाडीचे पदाधिकारी, माजी सैनिक, शंभुभक्त, शंभुसैनिक प्रयत्न करत आहेत. आता सामान्य जनता व शेतकरी वर्गाचा विचार करून वीज बिल माफीबाबत शंभुसेनेनेही जोरदार आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. तरी सर्व- सामान्य माणसाला दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने लवकरात लवकर तात्काळ शेतीसह घरगुती वीज बिले माफ करावीत असे कळकळीचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनचर्या न्युज