अंधारी, वैनगंगा नदीवरील पुलासाठी मिळणार 110 कोटी चा निधी




अंधारी, वैनगंगा नदीवरील पुलासाठी मिळणार 110 कोटी चा निधी

आ. मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले बळ

दिनचर्या न्युज :-
नवी दिल्ली, ता. : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात असलेल्या अंधारी नदीवरील पूर्ण व्हावा, यासाठी स्थानिक नागरिक व केंद्र सरकार यांच्यात संवादसेतूची भूमिका महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यशस्वीपणें पार पाडीत आहेत. पुलाचे काम तत्काळ व्हावे, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली; आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या पुलाच्या पूर्णत्वाकरिता केंद्रीय रस्ते विकास निधीतून ११० कोटी रुपये देण्याचे आश्वासन श्री नितीन गडकरी यांनी आज दिले.

पोंभूर्णा तालु्क्यातील दळवळण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. पोंभूर्णा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग देवई-केमारा-चिंतलधाबा-सोनापूर-मोहाडा-नवेगाव मोरे-दिघोरी-पिपरी देशपांडे परिसरातील जिल्ह्याची सीमा प्र.जी.मा ५५ येथे सोनापूर-मोहाडी (मिसिंग लिंक) दरम्यान अंधारी नदीवर (किमी २१/००) मोठा पूल उभारणे गरजेचे झाल्याचे आ. मुनगंटीवार यांनी गडकरी यांच्या लक्षात आणून दिले. या पुलाची उभारणी झाल्यास या महामार्गावरील दळणवळण अधिक वेगवान होऊ शकेल. त्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी बैठकीत नमूद केले. अंधारी नदीवर पूल झाल्यास पोंभूर्णा तहसील, भिमणी व गडचिरोलीतील विकास वेगाने साधता येईल, असेही ते म्हणाले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर जुनगाव, देवाडा, नांदगाव मार्गादरम्यान वैनगंगा नदीवरही पुलाची उभारणी काळाची गरज बनल्याकडे आ. मुनगंटीवार यांनी गडकरींचे लक्ष वेधले. गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीमुळे येथील वाहतूक विस्कळीत होत असते. ही गैरसोय टाळण्यासाठी पुलाची उभारणी झाल्यास चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणारी वाहतूक अधिक सोयीस्कर होईल. यासाठी सात हजार लक्ष रुपयांचा निधी द्यावा व दीड वर्षात पुलाच्या लोकार्पणासाठी आपण यावे, अशी विनंतीवजा निमंत्रणही आ. मुनगंटीवार यांनी गडकरी यांना दिले.
*बल्लारपूर शहरात ३००० घरे!*
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात ३००० घरे बांधण्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. यासंदर्भात श्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करु असे सांगितले.
*चंद्रपूर नागपूर ब्रॉड गेज मेट्रो*
चंद्रपूर हून नागपूर कडे जाणाऱ्या प्रवाश्यांना उत्तम व जलद सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ब्रोडगेज मेट्रो चा प्रस्ताव या बैठकीत चर्चिला गेला. लवकरच यासाठी पावले उचलली जातील असे श्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

दिनचर्या न्युज