सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच सरकारचे ध्येय-पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार*
गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधावाटप कार्यक्रम
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. ११ : पुढील आठवड्यापासून गणरायाच्या आगमनाने सणासुदीला सुरुवात होत आहे. हे दिवस आनंद आणि उत्सवाचे असून या उत्सवात गरीब कुटुंब देखील सहभागी व्हावे, या उद्देशाने राज्यातील १ कोटी ६२ लक्ष कुटुंबांना (५ कोटी लोकसंख्या) आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच सरकारचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शहरातील जटपुरा गेट येथील स्वस्त धान्य दुकानात गणेशोत्सवनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, चंद्रपूरचे तहसिलदार विजय पवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडुरंग माचेवाड, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंह, अंजली घोटेकर, छबु वैरागडे, रवी आसवानी, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, शितल आत्राम, रवि गुरनुले, राहुल घोटेकर, रवि लोणकर, स्वस्त धान्य दुकानदार विजय बेले, अनिल बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बाजारभावापेक्षा कमी दराने केवळ १०० रुपयांमध्ये हा आनंदाचा शिधा मिळणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्य सरकारने गेल्यावर्षी दिवाळीमध्ये आणि यावर्षी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव व इतर सणांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, उत्सवाच्या दिवसात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा हा एक प्रयत्न आहे. राज्य सरकार पूर्ण शक्तीने सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे असून नागरिकांनी सुद्धा विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच पदाधिकाऱ्यांनी या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्या.’ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना सणानिमित्त राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ किट वाटप करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे १ लक्ष ३९ हजार ७५० लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लक्ष ७७ हजार २५० लाभार्थी असे एकूण ४ लक्ष १७ हजार लाभार्थी आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याकरीता ४ लक्ष ४ हजार ४९० आनंदाचा शिधा संच उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमाला चांद सय्यद, शीतल गुरुनुले, सविता कांबळे, सचिन कोतपल्लीवार, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, अरूण तिखे, शिला चव्हाण, यांच्यासह वॉर्डातील नागरीक उपस्थित होते.
*८९० कुटुंबांना मोफत आनंदाचा शिधा*
जटपुरा वॉर्ड क्रमांक १, रामनगर रोड, चंद्रपूर येथील वॉर्डात जवळपास ८९० कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबांना मोफत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. ८९० कुटुंबांचे प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आले. दुकानदारांनी संबंधित कुटुंबांना आनंदाचा शिधा देताना त्यांच्याकडून एकही रुपया घ्यायचा नाही, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
*असा आहे आनंदाचा शिधा*
चनाडाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो आणि पामतेल १ लीटर अशा चार पॅकेटचा हा आनंदाचा शिधा आहे. मशीनवर अंगठा लावताना आपल्या पिशवीत चार पॅकेट असल्याची लाभार्थ्यांनी खात्री करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
*पालकमंत्री यांच्या हस्ते वाटप*
गणेशोत्सवानिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वॉर्ड क्रमांक १ मधील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यात लता सिडाम, शहनाज हुसैन, प्रभुदास तेलमासरे, मरीयम शेख, मोहसीन शेख, लता बेले, मिरा तिवारी, संगिता लोखंडे, वासुदेव इटनकर, संजय रामटेके, अशोक शेंडे यांचा समावेश होता.
*गरिबांसाठी विविध योजना*
केंद्र व राज्य सरकारने गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुरुवातीला मानधन ६०० रुपये होते. अर्थमंत्री झाल्यानंतर यात वाढ करून १२०० रुपये करण्यात आले. तर आता राज्य शासनाने हे अनुदान १५०० रुपये केले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून आता ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून नागरिकांना ५ लक्षपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.