पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रावण जुनघरे अनंतात विलीन
शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूरः- चंद्रपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती, गुरूदेव सेवक व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, धानोरा पिपरीचे भाजपाचे जिल्ह्यातील पहिले सरपंच श्री. श्रावण गणपती जुनघरे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, ३ मुली व नातवंड आहेत.
श्री. जुनघरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. स्व. श्रावण जुनघरे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी पक्षाचे संघटन बळकट करण्याकरिता मौलिक योगदान दिले आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा स्वीकारून त्यांनी गुरूदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून बहुमूल्य कार्य केले. त्यांच्या पार्थिवावर धानोरा पिपरी येथील स्मशानभुमीत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना शोकश्रध्दांजली वाहिली.