पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प

 अण्णापूर (प्रतिनिधी):
जल-वायू-अग्नी हे मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. यावरच आपले जीवनमान अवलंबून आहे. परंतु गेल्या काही वर्षात पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहेत. यासाठी प्रत्येकजण थोड्याप्रमाणात का होईना जबाबदार आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या चुकांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.त्याचाच परिणाम मानवी जीवन आणि प्राण्यांवरही होत आहे. आता हे थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी शपथ घेऊन यापुढील काळात आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या वस्तू न वापरणे, परिसराची स्वच्छता ठेवणे, फटाके न वाजविणे यासारख्या गोष्टी जर टाळल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त वृक्षारोपण करुन पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण थांबवू शकतो .याकरिता ढोकसांगवी (शिरुर ) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वच्छता, प्लॅस्टिक बंदी व फटाकेमुक्त दिवाळीची शपथ घेत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी शाळेच्या  मुख्याध्यापिका संगीता पळसकर  पदवीधर शिक्षक दत्तात्रय गाडदरे, ज्ञानेश पवार , गंगाराम थोरात , संतोष श्रीमंत ,  राजु कर्डीले , रोहिदास सोदक,जिजाबापु गट,सुरेखा पवार,वैशाली ठिकेकर,संगिता मंडले,दिपाली जाधव, मनिषा पवार,सविता थोपटे,नलिनी कळमकर,शशिकला थोरात,माधुरी श्रीमंत हे शिक्षक , शालेय मंत्रिमंडळ  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणाना वाव देण्यासाठी शाळेतर्फे आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, आकर्षक डिझाईनच्या पणत्या, शोभेच्या वस्तू बनविल्या होत्या. त्या सर्व आकाशकंदीलांनी शाळेला सजविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपण शाळेत प्रवेश करतानाच शाळेची स्वच्छता व विविध रंगाचे फ्लॕग पाहुन  आपण एखाद्या इंग्रजी शाळेत आल्याचा भास होतो.
खासकरुन शाळेची हाऊसवाइज रचना, स्पर्धा परिक्षेचा पाया अधिक भक्कम व्हावा म्हणुन दरमहा होणारी 'ढोकसांगवी प्रज्ञा शोध परीक्षा (डीटीएसई )', शालेय मंत्रिमंडळ निवडीसाठीची निवडणूक पद्धत , विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने इतर परीनांही सामोरे जाता यावे यासाठी 'कौन बनेगा ज्ञानपती, बचतची सवय व्हावी यासाठी 'शालेय बचत बँक ', वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी' हेल्पिंग हँड' यासारख्या नाविन्यपुर्ण उपक्रमांचे शाळेत आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत असतात. आज विद्यार्थ्यांना  दिलेल्या फटाकेमुक्त दिवाळीची शपथ हे सर्व  विद्यार्थी आचरणात आणून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करतील असा विश्वास सर्व शिक्षकांनी यांनी यावेळी व्यक्त केला. ज्ञानेश पवार  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, दत्तात्रय गडदरे यांनी आभार मानले.