महा मेट्रो : वर्धा मार्गावर व्हायाडक्टचे कार्य अंतिम टप्प्यात

महा मेट्रो : वर्धा मार्गावर व्हायाडक्टचे कार्य अंतिम टप्प्यात





नागपूर/प्रतिनिधी
महा मेट्रो नागपूरच्या रिच-१ कॉरिडोरचे कार्य जवळपास पूर्ण होत आले असून सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या मेट्रो मार्गावर आता केवळ १३ स्पॅन उभारण्याचे कार्य शिल्लक आहे. यापैकी सोमलावाडा मेट्रो स्टेशनजवळ २, जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशनजवळ ३, रहाटे कॉलोनीजवळ कृपलानी मेट्रो स्टेशन येथे १ व सीताबर्डी परिसरात ७ मेट्रोचे स्पॅन लावण्यात प्रक्रिया सुरु आहे. यापैकी सोमलावाडा आणि जय प्रकाश नगर येथे सुरु असलेले स्पॅनचे कार्य या आठवड्यात पूर्ण होणार आहे. शहरात मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावरील व्हायाडक्टचे कार्य देखील अंतिम टप्यात असून निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्यासाठी काऊनडाऊनला सुरवात झाली आहे.

मिहान मेट्रो डेपो ते मुंजे चौक मेट्रो स्टेशन पर्यंत १२.५ किमी अंतर असून यात २९६ स्पॅन लागणे प्रस्तावित होते. यापैकी २७३ स्पॅन आतापर्यंत लावून झाले आहेत. वर्धा मार्गावरील मेट्रोचे ८ किमी इतके अंतर व्हायाडक्टवर आहे. यादरम्यान रहाटे कॉलोनीजवळ मेट्रोचे पॉकेट ट्रक आहे. ०.५ किमीचे हे पॉकेट तयार झाले आहेत. म्हणजेच मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोचा प्रवास पुलावरून होणार आहे.  रिच-१ कॉरिडोर मध्ये एकूण ७ मेट्रो स्टेशन हे एलिवेटेड सेक्शनवर असेल. या मार्गावर पॉकेट ट्रकचे २० स्पॅन धरून एकूण ३१६ स्पॅन आहेत.

वर्धा मार्गावरील रिच-१ कॉरिडोर मध्ये १६५६ पाईल्स, ३०९ पाइलकॅप, ३०९ पियर, २८३ पियर कॅप्स, १३ पोर्टल बीम आणि ६२ पियर आर्म आहेत. यापैकी पाईल्स आणि पियर कॅप्सचे कार्य पूर्ण झाले आहे. तर केवळ ५ पियर्स, १ पियर कॅप, २ पोर्टल बीम्स, ५ पियर आर्म आणि १३ स्पॅनचे कार्य आता पूर्ण होणे बाकी आहे. आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यकरिता ७ हायड्रॉलिक रिगची तरतूद रिच-१ मध्ये करण्यात आली. यामुळे या भागातील एकूण ९५ टक्के पाइलिंगचे कार्य गेल्या २ वर्षात पूर्ण झाले आहे. ३ ओव्हरहेड लॉन्चिंग गर्डर आणि ५ ग्राउंड लॉन्चिंग सिस्टीम देखील या रिचमधील कार्यकरिता तैनात करण्यात आले आहेत.