महिलांनी समस्या सोडविण्यासाठी आत्मविश्वास बाळगणे महत्वाचे :आशा गरुड

परभणी/गोविंद मठपती:

स्त्री शक्तीचा इतिहास हा अनादी काळापासून आहे परंतू पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याचे काम केले जात असल्याने कामकाज करणाऱ्या महिलांनी समस्या सोडविण्यासाठी स्वत: कुठल्याही परिस्थितीस तोंड देण्यासाठी आत्मविश्वास बाळगणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांनी केले.
राज्य महिला आयोग व कै.रमेश वरपुडकर वरिष्‍ट महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कामकाजी महिलांपुढील समस्या व आव्हाने’ या एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्षा श्रीमती भावना नखाते, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती वनिता चव्हाण, ॲङ माधूरी क्षीरसागर, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, डॉ. अश्विनी मोरे, शौकत पठाण आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्रीमती गरुड म्हणाल्या की, आजच्या संगणकीय युगात महिला या सर्वच क्षेत्रात अग्रेसर दिसून येतात. विविध आस्थापनेवर महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महिलांच्या बाजुने पुरुषांनी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. तसेच महिलांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी कुठल्याही समस्येला तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रसंगी योग्य त्या समितीकडे अथवा कायदेशीर तक्रार देण्याचीही तयारी ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्षा श्रीमती नखाते बोलताना म्हणाल्या की, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते त्यामुळे मनाचे खच्चीकरण न करता महिलांनी ध्यैर्याने कामे करावीत. समाजातील कु-प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महिलांनी नेहमी कायद्याचे सहाय्य घ्यावे तसेच काम करत असतांना आरोग्याची काळजी घ्यावी जेणेकरुन कुटुंबातील इतर सदस्यांचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होईल. तसेच हुंडा घेणाऱ्या मुलांसोबत मुलींने लग्न करु नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संस्थाध्यक्ष परमेश्वर कदम यांनी इतिहासात ज्या स्त्रियांमुळे महामानव घडले त्यांचे उदाहरण देवून सर्व क्षेत्रात आज महिला अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण संस्थेतही मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी उपलब्ध करुन दिल्याचेही सांगितले.

कार्यशाळेतील पहिल्या सत्रात कामकाजी महिलांच्या समस्या व कायदे या विषयावर ॲड माधुरी क्षीरसागर व राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती वनिता चव्हाण यांचे मार्गदर्शन तर दुसऱ्या सत्रात भारतीय समाजाची मानसिकता व कामकाजी महिलांच्या समस्याया विषयावर ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राच्या संचालिका डॉ.अश्विनी मोरे व डॉ.अंजली जोशी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी साप्ताहिक सोनपेठ दर्शन वर्धापन दिनानिमित्त अंकाचे विमोचन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले तसेच लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.ए.के.जाधव लिखीत संत गाडगे महाराज व ग्राम स्वच्छता या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी स्वागतगीत कु.श्वेता व नेहा किरवले यांनी सादर केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.विठ्ठल जायभाये यांनी केले तर आभार डॉ.मुकुंदराज पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.संतोष रणखांब, प्रा.सखाराम कदम डॉ.सुनिता टेंगसे, प्रा.पंडित जोंधळे यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेस मोठ्या प्रमाणात महिलावर्गासह, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.