तेजूरच्या ठाकरवाडीतील विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस


जुन्नर (पुणे) / आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील आदिवाशी भागातील तेजूर ठाकरवाडीतील जि.प शाळेतील आदिवासी ११२ विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांने स्पोर्टस ड्रेस दिवाळी भेट दिले अशी माहिती मुख्याध्यापक आ.का.मांडवे यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेतील अभियंता व तेजूरचे रहिवाशी रामदास आढारी यांनी तेजूर ठाकरवाडी शाळेस भेट दिली.
शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता पाहून या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला .त्यांनी या विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस भेट दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,याच मातीत मी शिक्षण घेतले.त्यावेळी एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या.मात्र त्यावेळच्या गुरुजीनी मला व माझ्या बरोबर शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले म्हणूनच मी अधिकारी झालो. आदिवासी ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर तेही माझ्यापेक्षाही मोठे होतील.मला माझे बालपण व त्यावेळची परिस्थिती लक्षात आली. या मुलांच्या करिता काहीतरी करावे म्हणून ही भेट दिली. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूप काही सांगून गेला. यापुढेही शाळेकरिता मदत देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी सरपंच संजय गावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर दुधवडे , तंटामुक्ती अध्यक्ष सनाशेठ केदार, मुख्याध्यापक आ.का.मांडवे ,सहकारी शिक्षक ता.म.तळपे,स.चि.नांगरे,कृ.ना.तुरे ,ल.दु. कुडेकर उपस्थित होते.