मनपात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजपाचे 'उबाठा'कडे साकडे !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला. मनपा 66 जागांपैकी काँग्रेस मित्र पक्षाला 30 जागा, भाजप मित्र पक्षाला २४, उबाठला ६, वंचित बहुजन आघाडीला २, बसपा आणि एमआयएमला१, तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. मनपा सत्ता स्थापन करण्यासाठी 34 जागांचा जादुई आकडा कोणत्याही पक्षाकडे नाही.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तर भाजप दुसरा पक्ष ठरला आहे. कोणत्याही राजकीय पक्षांना स्पष्ट बहुजन होत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी ' उबाठा' उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे साकडे घालावे लागत आहे. ते ६ जागावर जिंकून तिसऱ्या नंबर वर असल्याने 'उबाठा' पक्ष 'किंगमेकर 'च्या भूमिकेत आहे. मनोमिलनासाठी काँग्रेस आणि भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक सफारीवर घेऊन गेल्याचे समोर येत आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना आता 'मशाल' समोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. असे चित्र मनपा महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षाकडे दिसून येत आहे. मात्र 'उबठाची' स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर,' अशी द्विधा मनस्थिती आहे. दोन्ही पक्षात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यापासून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते 'मशालच्या' संपर्कात आहेत. काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया हे उभबाठाचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांच्या सतत संपर्कात असून त्यांचा कानोसा घेत आहेत.' संदीप गि-हे म्हणाले,' 'आम्हाला कोणीही गृहीत धरून चालू नये' असे बोलून आधी स्पष्ट करून सर्वांसाठी चर्चेसाठी त्यांनी आपले दारे खुली ठेवले आहेत. त्यामुळे या सत्ता स्थापनेत मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही चर्चिले जात आहे. आपल्या शिवाय सत्ता स्थापन होणार नाही असा ठाम विश्वास उबाठाला असल्याने, मोठी पदाची आफर ठेवून काँग्रेस आणि भाजपाला कोंढीत ठेवण्याची मोठी संधी 'मशाल' कडे आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीच्या दोन जागा, अपक्षाच्या दोन आणि इतर पक्षाचेही या भूमिकेवर बरेच काही अवलंबून आहे. यांच्या हातात मनपाच्या सत्तेची चावी आहे.
सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार हालचालींना वेग आला आहे.सध्या दोन्ही पक्षाकडून नगरसेवकांना पळवा पळवी केल्याच्या समोर येत आहे. त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन जात असल्याची चर्चा शहरात असून मनपात महापौर या पदासाठी आरक्षण जाहीर होताच कोणत्या पक्षाचा महापौर बनेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत नवनिर्वाचित नगरसेवकांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेल्याची चर्चा होत आहे. सर्व नजरा'उबाठा' या पक्षाकडे लागले असून हा पक्ष वाकणार पण मोडणार नाही अशा आत्मसन्मानसाबुत ठेवून 'किंगमेकर' ची भूमिका सत्ता स्थापनेसाठी वटवणार आहे.
काँग्रेस आणि भाजपला सत्तेसाठी कुबड्याची गरज भासणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजकाना पराभवाचा फटका बसला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांना खाताही खोलता आले नाही. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधानंतरही अपक्ष नंदू नागरकर आणि प्रशांत दानव यांनी आपला गड राखला. जुन्या १७ नगरसेवकांनी पुन्हा विजयश्री प्राप्त केली. महानगरपालिकेच्या कारभारात ४९ नवीन चेहऱ्यांनी संधी प्राप्त झाली. आता मनपाच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
