552 शेतक-यांना नौकरी व 135 कोटींचा मोबदला वाटप

  • गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने 
  • जमिनीच्या पैशातून नवीन जमिनी खरेदी करा 
  • वेस्टर्न कोल्डफील्ड लिमीटेडकडून शेतकऱ्यांना मोबदला व नौकरी


चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : आमच्या हजारो पिढ्यानी आधी शेतीच केली आहे. त्यामुळे शेती कशी करायची हे आमच्या रक्तात आहे. शेती आपली आई आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी त्याचा मोबदला घेताना पैसा हातचा न गमावता काही पैशातून पुन्हा शेती खरेदी करा,केंद्र सरकारने मोबदल्याचे धोरण बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्याचा शेतकऱ्यांनी योग्य उपयोग करावा, असे भावनिक आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घुगुस येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.

वणी क्षेत्रातील मिनी रत्न कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मुंगोली, निरगुडा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आज 135 कोटी रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच 552 शेतक-यांना वेकोलिच्या प्रकल्पात नौकरी देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याहस्ते हे धनादेश वाटप वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेडने आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात पार पडले.

शेतकऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी ज्या शेतकऱ्यांची शेती केली. त्यांनी ती पुन्हा घ्यावी असे भावनिक आवाहन केले. 2022 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे आवाहन केले असून शेतीला चांगले दिवस येत असल्याचे सूतोवाच यावेळी केले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह वेकोलि अध्यक्ष प्रबंध निदेशक आर.आर. मिश्रा,वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदरकुरवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, सभापती ब्रिजभुषण पाझारे, खुशाल बोंडे, विजय पिदूरकर,दिनकर पावडे, वेकालि वणी क्षेत्राचे क्षेत्रिय महाप्रबंधक श्री. मिश्रा, वेकालि वणी क्षेत्राचे नवीन क्षेत्रिय महाप्रबंधकश्री. कावळे, जि.प. सदस्य नितू चौधरी, राहूल सराफ, बेलसनीच्या सरपंच मनिषा वाढई, निलजईचे सरपंच मनोज डंभारे, बेलोराचे सरपंच प्रकाश खुटेमाटे आदी उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना हंसराज अहिर यांनी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव असून त्यांच्या काळातच मोबदला देण्याचे ब्रिटीशकालीन कायदे बदल करण्यात आले आहेत. गरीब घरात जन्मलेल्या प्रधानमंत्र्यांना गरिबीची जाणीव असून त्यामुळेच येत्या काळामध्ये शेतीला चांगले दिवस येतील ,अशी आशा आपण बाळगायला हवी.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण अवलंबिले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती प्रकल्पामध्ये जात आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला मिळतो आहे. मात्र या मोबदल्यात काही रक्कम पुन्हा वेगळ्या ठिकाणी शेती घेण्यासाठी खर्च करावी,अशी आपली प्रामाणिक सूचना आहे. कारण शेती ही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जगण्यास व आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यास कमी पडते. यासाठी आपल्याला कुठल्या आयटीआयचे प्रशिक्षण घ्यायची गरज नसते. कारण आमच्या लाखो पिढ्यांना शेती कशी करायची माहिती आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा व घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी यावेळी उल्लेख केला.

कधीकाळी कोळसा खाणी व संबंधीत कंपन्या ह्या घोटाळ्यासाठी प्रसिद्ध झाल्या होत्या. आपण सुद्धा या कोळशाच्या विक्री प्रकरणांमध्ये लक्ष घातले होते. संसदेत आवाज उचलला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणीच्या पैसा सार्वजनिक हिता मध्ये आता वापरात येऊ शकला आहे. आज मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणात याठिकाणी मोबदला देता आला याचा आपल्याला समाधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी देखील यावेळी संबोधित केले. शेतकऱ्यांच्या संदर्भात गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाभर केलेल्या लढ्याला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांपुढे मांडले. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढणारा विदर्भातील अग्रणी नेता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वणी, घुगुस, वरोरा, भद्रावती या ठिकाणी गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये हंसराज अहीर यांनी मोठा लढा उभारून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.