बल्लारपूर रोजगार निर्मितीचे केंद्र होईल : ना.सुधीर मुनगंटीवार

  • शहरातील सात कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
  •  3 हजार बेघरांना हक्काचे घर देण्याचा प्रकल्प राबवणार
  • बल्लारपूर भारतातील सर्वात सुंदर शहर बनवण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.30 डिसेंबर - बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, क्रीडा संकुल, डायमंड प्रशिक्षण केंद्र, एक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपूरातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भारतातील एक सर्वात सुंदर शहर म्हणून पुढे येतच आहे. नजीकच्या काळात ते रोजगार निर्मितीचे मुख्य केंद्र देखील होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
बल्लारपूर शहरातील शिवाजी वार्ड, गौरक्षण वार्ड, रविन्द्र नगर वार्ड ,मौलाना आझाद वार्ड आदी ठिकाणच्या 7 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन आज ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील विविध तीन भागांमध्ये घेतलेल्या सभांमध्ये बोलताना त्यांनी बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या शहराने भरभरून आपल्याला दिले असल्यामुळे या शहराला रोजगार, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधांनी भारतातील एक सुंदर शहर बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बल्लारपूर मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील बदल आता लक्षात येण्याइतपत जाणवतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील एका सर्वांगसुंदर मतदारसंघाचे वैभव या बल्लारपूर मतदारसंघाला प्राप्त होईल. येथील सैनीकी शाळा देशाला भूषण ठरणारी बनत आहे. बॉटनिकल गार्डनची जोमाने तयारी सुरू आहे. शहरांमध्ये तयार होत असलेल्या क्रीडा संकुलामधून 2024 मध्ये देशासाठी ऑलिम्पिक पदक पटकविणारे खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा आहे. मुलींची पहिली डिजिटल शाळा नगरपालिकेमार्फत या ठिकाणी निर्माण होत आहे. षटपूजेसाठी उत्तम व्यवस्था, गणपती घाट, पोलीस स्टेशन, उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह, वाचनालय शहराच्या वैभवात भर टाकत आहेत. शहरात उत्तम बाजारपेठही आकाराला येणार आहे. याठिकाणी अद्ययावत पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालय लक्षवेधी ठरले आहे.

बल्लारपूर शहरांमध्ये एकूण 90 कोटी रुपये खर्च करून 24 तास चालणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र रस्ते निर्मिती आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सांगड घालण्यासाठी या योजनेला थोडा विलंब होत आहे. बल्लारपूरच्या प्रत्येक वार्डामध्ये नागरिकांना मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध पाणी देणारे पाण्याचे एटीएम उघडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र या सर्व विकास कामांमध्ये या शहराच्या नागरिकांकडूनही काही अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, देशांमध्ये स्वच्छता अभियानात हे शहर पहिले आले पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी देखील आपले दायित्व निभवावे. भारतात सर्वात स्वच्छ व सुंदर शहर हे माझ्या मतदारसंघात आहे, याचे मला समाधान असले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बल्लारपूर मतदारसंघाने आपल्याला भरभरून दिले आहे. याचा विसर आपणास कधीच पडणार नाही. बल्लारपूर शहरातील तीन हजार बेघरांना अद्यावत घरे देण्याचे आपले स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय बल्लारपूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी डायमंड प्रशिक्षण केंद्रासोबत कापड उद्योगाला पूरक ठरेल असे एक हजार शिलाई मशीनचे युनिट उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी सुरु होणारे बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा व अन्य मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक बेरोजगारांना उपलब्ध व्हावे, ही महत्वाकांक्षा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील संविधान चौकाचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच बल्लारपूर शहरांमध्ये देखील एक अद्यावत अभ्यासिका सुरू करून मिशन सेवाच्या माध्यमातून या ठिकाणच्या मुलांमध्ये सरकारी नोकरीतील टक्का वाढविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज झालेल्या विकासकामांच्या भूमीपूजनाला वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, बल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्ष मीनाताई चौधरी, सभापती रेणुका दुधे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपिन मुग्धा,नगरसेवक निशांत आत्राम, मीना बहुरिया, सुवर्ण भटारकर, सागर राऊत, सचिन जाधव, पुनम निरांजने याशिवाय अन्य नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.