अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी मुनगंटीवार चंद्रपूर न्यायालयात




चंद्रपूर :  अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी आज चंद्रपूर न्यायालयात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. यासाठी मुनगंटीवार स्वत: चंद्रपूर न्यायालयात आले होते.

अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर १० नोव्हेंबर २०१८ रोजी एका पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. ते आरोप तेव्हाच मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले होते. मुनगंटीवार यांना वाघ मारण्यात अधिक रस असून त्यांच्यात आणि शिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता.

संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाहीत. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेव्हाच दिली होती. त्यानुसार आज सुधीर मुनगंटीवार यांनी निरुपम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.